वर्धा : महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांनी चंद्रपूर येथे जाहीररित्या पत्रकार परिषदेत वन्यजीवाने कोणत्याही व्यक्तीला हल्ला करून ठार केल्यास आठ लाख रुपयांची मदत जाहीर केली़ साप हा वन्यजीव आहे़ सर्पदंशाने अनेक माणसे मरतात़ त्यांना आर्थिक मदत दिली जात नाही़ यामुळे सर्पदंशाने मृत्यू पावणारा व्यक्ती हा भारतीय नाही काय, असा सवाल महाराष्ट्र अंनिस व विदर्भ सर्प मित्र मंडळाने उपस्थित केला आहे़ याबाबत विदर्भ सर्प मित्र मंडळातर्फे संस्थापक गजेंद्र सुरकार यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, वनमंत्री भारत सरकार, राज्यपाल, मुख्यमंत्री, वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे़ सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीलाही मदत दिली जावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे़ साप हा वन्यजीव आहे़ विषारी सापाने दंश केलेल्या व्यक्तीस योग्य वेळेत उपचार मिळाल्यास तो वाचतो; पण किमान ५० हजार ते ५ लाखापर्यंत उपचाराचा खर्च येतो़ अन्यथा उपचार दरम्यान वा योग्य उपचार न मिळाल्यास, वेळेवर दवाखान्यात न पोहोचल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो़ हा व्यक्ती साधारणपणे ९९ टक्के गरीब शेतकरी, शेतमजूर वा शहरातील मजूर असतो; पण साप वन्यजीव असताना या व्यक्तीला कुठलीही मदत दिली जात नाही़ वाघ, बिबट, अस्वल, हत्ती यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मोबदला म्हणून आठ लाख रुपये मिळतात़ साप, वाघ, बिबट, अस्वल, हत्ती हे सर्वच वन्यजीव आहे़ साप हा राष्ट्रीय प्राणी नाही; पण उंदीर या उपद्रवी प्राण्यावर नियंत्रण ठेवून देशाचे धान्य वाचवितो़ वाघ, बिबट, अस्वल, हत्ती आदी प्राणी हल्ला करून मनुष्यास मारतात़ ते राष्ट्रीय प्राणी आहेत़ एवढाच काय तो फरक आहे़ यामुळे सर्पदंशाने मृत्युमूखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबांनाही आर्थिक साह्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र अंनिस व विदर्भ सर्पमित्र मंडळाने केली आहे़ निवेदन सादर करताना गजेंद्र सुरकार यांच्यासह अविनाश काकडे, प्रकाश कांबळे, मंगेश शेंडे, मयूर राऊत, श्रेया गोडे, प्रमोद भोमले, सुरेश पट्टेवार आदी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)
सर्पदंशाने मृत्यू होणारे व्यक्ती नागरिक नाहीत काय?
By admin | Updated: December 9, 2014 22:56 IST