जिद्दीचे फलित : वर्धा जिल्ह्याची पताकाआर्वी : ध्येय निश्चित असले की, वाटचाल सोपी होते, असे म्हटले जाते. ही बाब शहरातील खडकपूरा वॉर्डातील २६ वर्षीय प्रवीण वऱ्हाडे याने सिद्ध केली. तो सध्या भारतीय व विदेशी क्रिकेट खेळाडूंचा मसाजर झाला आहे. पूर्वीपासून जोपासलेले हे ध्येय त्याने चिकाटीच्या जोरावर गाठले. खडकपूरा वॉर्डातील प्रवीण हा होतकरू विद्यार्थी होता. काही नवीन करण्याची उर्मी त्याच्या मनात होती. तारूण्यात पदार्पण केल्यावर त्याने न.प. च्या हनुमान व्यायाम शाळेत शरीर सौष्ठवचे धडे गिरविले. पिळदार शरीरयष्टी कमविली. शाळेत व व्यायमशाळेत तो खेळाडुंची मसाज करीत होता. यातून त्यांना आराम पडू लागला. पूढे त्याचा मसाज करण्यात हातखंडा वाढत गेला. मसाजचे प्रशिक्षण न घेता सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे यांच्या हेल्थ क्लबमध्ये सहा वर्षे व महात्मा गांधी आयुर्विज्ञान रुग्णालयात तीन वर्षे काम केले. २०१५ च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तळेगावच्या हॉटेलमध्ये राजस्थान रॉयल संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर यांच्याशी त्याची ओळख झाली. क्रिकेटपटूंची मसाज करण्याची संधी द्यावी, असा आग्रह प्रवीणने त्यांच्याकडे धरला. भिंडर यांचा अहमदाबाद येथे ये, असा फोन आला. तेथे भारतीय संघाचे फिजीओथेरपिस्ट जॉन क्लोस्टर यांच्याशी त्याची भेट करून दिली. त्यांनी मसाजचा अनुभव घेतल्यावर राज कुंद्रा यांच्या राजस्थान रॉयल संघाच्या खेळाडुंची मसाजची संधी दिली. मुंबई येथे हॉटेलमध्ये २० दिवस आॅस्ट्रेलियन खेळाडू वॉटसन स्मिथ, भारतीय खेळाडू राहुल द्रविड, अंजिक्य रहाणे आदींची मसाज त्याने केली. भविष्यात भारतीय खेळाडुंची मसाज करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण होईल, असा विश्वास त्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.(तालुका प्रतिनिधी)
आर्वीचा प्रवीण झाला क्रिकेट खेळाडूंचा मसाजर
By admin | Updated: May 15, 2016 01:49 IST