धनादेश खात्यात जमा होण्यासाठी पॅन कार्डची अटपुलगाव : पॅनकार्ड असल्याशिवाय धनादेशाची रक्कम बचत खात्यात जमा होऊ शकत नाही. पॅनकार्ड वा पावती आणा तरच रक्कम जमा करू, अशी अट पोस्टातील कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेस घातली. यामुळे वयाच्या ७० व्या वर्षी पॅनकार्ड काढण्यासाठी सही शिकण्याची वेळ वृद्धेवर आली.कवठा (रेल्वे) येथील शकुंतला कवाडे (७०) यांनी सात वर्षांपूर्वी येथील पोस्टात ५० हजार रुपये ‘फीक्स डिपॉझिट’ केले. मुदतीनंतर त्यांना व्याजासह १ लाख ३३५ रुपये मिळाले; पण पोस्टाने रोख रक्कम न देता धनादेश दिला. चेक वटवायचा असेल तर पॅनकार्ड वा पावती दाखवा, अशी अट घातली. यामुळे महिलेने पॅनकार्ड कार्ड अर्ज भरल्याची पावती सादर केली; पण पॅनकार्ड पाहिजेच, असे सांगितले. पॅनकार्ड अर्जावरील रकान्यात अंगठा चुकत असल्याने अर्ज परत येत होता. यामुळे रक्कम खात्यात जमा होत नव्हती. अखेर वृद्ध महिलेने सही शिकण्याचा निर्धार केला. काही दिवसांतच त्या वयाच्या ७० व्या वर्षी सही करण्याइतपत साक्षर झाल्या; पण पॅनकार्डची अट चुकीची होती, हे पोस्ट कर्मचाऱ्यांना उशिरा कळले. चुकीच्या अटीमुळे वृद्ध महिला मात्र साक्षर झाली.(शहर प्रतिनिधी)६० नंबरचा फार्म भरून चेक जमा करता येतो. पॅनकार्डची गरज नाही. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बचत खात्यातून काढायची असेल तर पॅनकार्ड पाहिजे.- एस.टी. इंगळे, पोस्ट आॅफिस वर्धा.
अखेर वृद्ध महिला झाली साक्षर
By admin | Updated: October 8, 2015 01:49 IST