आजनसरा : महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, हा मंत्र दिला; पण महात्मा गांधींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातच या मंत्राकडे पाठ फिरविली जात असल्याचे दिसते़ स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटली; पण सोनेगाव (राऊत) या गावाला डांबरी रस्ता पाहता आला नाही़ आजही या गावात जाण्याकरिता रस्ता नसल्याने ग्रामस्थांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत़ श्री संत भोजाजी महाराज व सती सोनामातेच्या चरण स्पर्शाने पावन आजनसरा या संतनगरीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या सोनेगाव राऊत या गावाला स्वातंत्र्याचे ६७ वर्ष उलटूनही डांबरी रस्ता मिळालेला नाही़ ही सोनेगाव येथील नागरिकांची शोकांतिकाच म्हणावी लागेल़ हे गाव फुकटा पं़स़ सर्कलमध्ये असून पं़स़ सदस्य प्रतीभा वरूटकर आहेत़ याच गावचे मूळ रहिवासी असलेले माजी जि़प़ सदस्य माधव चंदनखेडे व माधुरी चंदनखेडे हे गत १५ वर्षांपासून सदस्य आहेत; पण गत ६७ वर्षांत या गावच्या रस्त्याची कुणीही दखल घेतली नाही़ जिल्ह्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे संत भोजाजी महाराज यांचे आजनसरा हे तिर्थक्षेत्रही अवघ्या तीन किमी अंतरावर आहे; पण रस्ता खराब असल्याने रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले आहे़ रस्त्याअभावी गावात परिवहन महामंडळाची बस येत नाही़ यामुळे ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे़ सोनेगाव येथे चवथ्या वर्गापर्यंत शाळा आहे़ पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना आजनसरा व वडनेर येथे जावे लागते़ या दोन्ही गावांचे अंतर ३ ते ९ किमी आहे़ शाळेत ये-जा करण्यासाठी रस्ता व पर्यायाने बस नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्यातच शिक्षण सोडून द्यावे लागले़ दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण नावाचे ‘ठिगळ’ लावण्याचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने पार पाडला होता; पण दोन महिन्यांतच ते ठिगळ निघाले़ या रस्त्याची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना निवेदने दिली; पण त्याचा उपयोग झाला नाही़निवडणुकीपूर्वी अनेक उमेदवारांनी रस्त्यासाठी आश्वासनाची खैरात वाटली़ त्यावर सोनेगाव येथील ग्रामस्थांनी विश्वास ठेवला; पण सर्वांनीच ग्रामस्थांचा विश्वासघात केला़ यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी राजकारण्यांना गावबंदी आंदोलन करणार असल्याचा मानस ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काळे, प्रशांत सुपारे, सुधीर बुरीले, गोपाल बुरीले, कपील खंडार, सुनील खंडार, सतीश बुरीले आदींनी व्यक्त केला़(वार्ताहर)
स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही सोनेगाव रस्त्यापासून वंचित
By admin | Updated: March 13, 2015 02:10 IST