दिलीप चव्हाण - सेवाग्रामआचार्य विनोबा भावे असामान्य प्रतिमांचे धनी होते़ महापुरूष होते. ऋषी, मुनी, संतांची अध्यात्मिक परंपरा त्यांनी निस्सीमपणे चालविली. वास्तविक, ते परंपरा चालविणारे साधक नव्हते तर अध्यात्म विद्येला नवी दिशा देणारे होते. मठ वा संप्रदायता ते गुरफटणारे नव्हते तर कर्मक्षेत्रात साहसपणाने प्रयोग करणारे असल्याने अनंत काळापर्यंत मानवजातीसाठी मार्गदर्शनाची क्षमता ठेवणारे महान पुरूष होते. विनायक नरहरी भावे यांचा जन्म कोकणातील गागोदे या खेड्यात ११ सप्टेंबर १८९५ मध्ये एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. आई धार्मिकवृत्तीची तर वडील वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारे़ असे दोघांचेही संस्कार विनायक यांच्यावर झाले; पण यात अध्यात्माचे बाळकडू त्यांना आपल्या मातोश्रीच्या प्रभाव व सहवासातून मिळाले. युवाअवस्थेत ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला. तरुणपणात अध्यात्म साधनेची ओढ तर दुसरीकडे स्वातंत्र्य संग्राम आणि राष्ट्रसेवेचे आकर्षण! १६ मार्च १९१६ मध्ये घर सोडले. बडोदा, नंतर मुंबई पूढे ते आपल्या मित्रासोबत काशीला गेले. तेथे ते अध्ययन करू लागले. काशी विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी गांधीजींनी भाषण दिले. त्यांनी ब्रिटीशशासक व देशातील राजांसमोर निर्भयपणे विचार मांडले. गांधीजींचे भाषण विनायकने वाचले व वेगळेपणा जाणवला. काही शंकांच्या निरसनासाठी बापूंना पत्र लिहिले़ बापूंनी उत्तर पाठविले; पण शंका होत्याच! शेवटी गांधीजींनी पत्र पाठवून बोलविले. ७ जून १९१६ मध्ये कोचरब आश्रमात (गुजरात) बापूंची त्यांनी भेट घेतली. हिमालयाकडे निघालेला युवक काशीमध्ये अध्ययनास थांबला़ बापूंच्या भाषणाने ते आश्रमवासी झाले. गांधीजींमध्ये त्यांना शांती व क्रांतीचा संगम दिसला़ कोचरब आश्रम मातृस्थान बनले. गांधीजींनी नाव दिले ‘विनोबा’. विनोबाजींच्या वडिलांना बापूनी पत्र पाठविले. इतक्या कमी वयात तेजस्विता व वैराग्याचा विकास केला. मला यासाठी अनेक वर्षे लागली, असे लिहिले. आश्रमात जे दुर्लभ रत्न आहेत, त्यातील एक विनोबा असून ते घ्यायला नाही द्यायला आले, असे गांधीजींनी दिनबंधू एंन्ड्रयूज यांना म्हटले.गांधीजींची सूचना व जमनालाल बजाज यांच्या इच्छेनुसार वर्धेला आश्रमची शाखा काढून ३० वर्षे संचालन केले. दरम्यान सहकाऱ्यांसह वर्धा, नालवाडी व जवळपासच्या गावांत सुतकताई, विनाई आदींसह ग्रामसेवेचे कार्य केले. आरोग्याच्या कारणास्तव ते पवनारमध्ये झोपडी बांधून राहू लागले़ १९४८ मध्ये सेवाग्रामला रचनात्मक कार्यकर्ता संमेलन झाले. यात सर्वोदयवर भाष्य केले. या महान योगीने १५ नोव्हेंबर १९८२ मध्ये स्वेच्छामरण स्वीकारले.
मानव जातीसाठी सक्षम मार्गदर्शक ‘आचार्य भावे’
By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST