लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अकस्मात वातावरणात बदल होत असून ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट व्हायला लागतो. कुठे पाऊस तर कुठे ऊन असा प्रकार होत असून गर्मीने नागरिक त्रस्त झालेत. मात्र, हमदापूर येथे चक्क ५ किलो बर्फाचा गोळा पडल्याने हा ढगफुटीचा प्रकार तर नाही ना, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
१० सप्टेंबर रोजी सायंकाळी वातावरण बदलले. आभाळ आले ढगांचा गडगडाट होऊन विजाही चमकल्या. अशातच पाऊस सुरू झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाल्मीक वासनिक यांच्या अंगणात काही तरी पडल्याचा आवाज आला. बाहेर पाऊस असल्याने ते बाहेर आले नाही. पाऊस थांबल्यावर बाहेर आले तर त्यांना बर्फाचा मोठा गोळा दिसून आला. शेजाऱ्यांपर्यंत ही खबर पोहचली. जवळपास ५ किलो वजनाचा तो बर्फाचा गोळा होता. वितळायला तीन ते चार तास लागल्याचे गुरुदत्त बावणगडे यांनी सांगितले.
'तो' गोळा आकाशातून पडला नाही : पंकज वंजारे
हमदापूर येथील वासनिक यांच्या घराच्या अंगणात दोन ते चार किलो वजनाची गार बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी पडल्याचा दावा व्हायरल व्हिडीओतून करण्यात आला. या घटनेच्या अनुषंगाने गुरुवारी, दि. ११ रोजी घटनास्थळाची स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. आकाशातून मोठ्या आकाराची अशा प्रकारे गार पडण्याचे प्रकार क्वचित घडतात, त्याला मेगाक्रायोमीटिअर असे म्हणतात. मात्र, त्याकरिता लागणारी पोषक भौगोलिक परिस्थिती या घटनेच्या वेळी वर्धा जिल्ह्यात नव्हतीच. या प्रकरणात तसे न होता तेथे फक्त एक २ सेंटिमीटरपेक्षाही कमी खोलीचा खड्डा आढळून आला. कोसळलेल्या बर्फाचे तुकडेपण झाले नसल्याचे ज्यांनी बर्फाचा तुकडा बघितला त्यापैकी काहींशी संवाद साधल्यावर नागरिकांनी सांगितले. हा बर्फाचा गोळा ६ इंच व्यासाचा होता, हे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले. सुमारे एक तास घटनास्थळाचे आणि ज्यांनी ज्यांनी ही गार बघितली त्यापैकी काहींशी संवाद साधल्यानंतर गार आकाशातून पडलीच नाही, असा निष्कर्श आकाश निरीक्षण मंडळाचे पंकज वंजारे यांनी काढला.