लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू व गरिबांना विनामूल्य उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठ रुग्णालयांमध्ये ७८ हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे या योजनेतून शस्त्रक्रियांवर १९४ कोटींचा खर्च झाला आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया सेवा या योजनेंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येते. त्यात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, डॉ. राणे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आर्वी, डॉ. लोढा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजाचा समावेश आहे.
रुग्णालयनिहाय शस्त्रक्रिया अन् खर्च...- सेवाग्राम येथील रुग्णालयात ३१ हजार ७९४, सावंगी येथील रुग्णालयात ४२ हजार ६३७, जिल्हा रुग्णालय वर्धा येथे २ हजार १३७, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे ४१३, डॉ. राणे हॉस्पिटल आर्वी येथे १ हजार २५८ व लोढा हॉस्पिटल हिंगणघाट येथे ४६२ गरजूंवर योजनेद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गरीब व गरजूंनाही चांगली आरोग्य सेवा मिळायला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना असून त्याची प्रभावी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात करावी. जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना कसा देता येईल, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. - प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.