प्रहारने वेधले लक्ष : अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्याची मागणी आर्वी : २० वर्षांपूर्वी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता निम्न वर्धा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आर्वी येथील नेरी पुनर्वसनचे प्रशांत पांडुरंग क्षीरसागर यांच्या शेतातील जवळपास अर्धा एकर जमीन हस्तगत केली. याला २० वर्षांचा कालावधी लोटूनही अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला त्यांना अद्यापही मिळालेला नाही. या संदर्भात क्षीरसागर यांनी अनेकवेळा निवेदने दिली. त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याने प्रहारच्यावतीने मंगळवारी शेतातील ६० फुट खोल विहिरीतच आंदोलन सुरू केले. नेरी पुनर्वसनाला पाणीपुरवठा करण्याकरिता विदर्भ विकास महामंडळ निम्न वर्धा प्रकल्प, वर्धा यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी प्रशांत क्षीरसागर यांच्या शेतातील अर्धा एकर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता हस्तगत केली. हस्तगत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रशांत क्षीरसागर गत २० वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांनी अनेक वेळा मोबदला मिळण्याविषयी निवेदनही दिले; मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यांनी या प्रकरणाची माहिती प्रहार संघटनेला दिली. त्यांच्याकडूनही प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला; मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्याच्या शेतातील ६० फूट खोल विहिरीत उतरून तिथेच प्रशांत क्षीरसागर व बाळा जगताप यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने खळबळ उडाली. तहसीलदारांनी आंदोलन स्थळ गाठत चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र ठोस आश्वासनाशिवाय बाहेर येणार नसल्याची भूमिका जगताप यांनी घेतली. तहसीलदारांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने प्रकरण निवळले.(तालुका प्रतिनिधी)चर्चेच्या आश्वासनावर आंदोलनाची सांगता प्रहारच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार चव्हाण यांनी उपविभागीय अभियंत्याशी संपर्क साधला असता मी काही कामानिमित्त वर्धेला असून आता येऊ शकत नाही असे कळविले. यामुळे चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून येत्या सोमवारी तातडीची बैठक घेत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
६० फूट खोल विहिरीत आंदोलन
By admin | Updated: December 23, 2015 02:41 IST