चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बाललैंगिक अत्याचाराच्या घटना होऊ नयेत, यासाठी पोलिस दलासह जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृतीसह इतर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अशा स्थितीतही गत ११ महिन्यांत जिल्ह्यातील ५२ मुली बाल लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. ओळखीच्या व्यक्तींनीच 'त्या' मुलींचा घात केल्याचे अनेकदा पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोक्सोअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी जेरबंदही केले आहे.
अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावरून कठोर कायदे करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुला-मुलीविरुद्धच्या गुन्ह्यांत आरोपींना अटक करण्यासह त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे 'गुड टच, बैंड टच'चे मार्गदर्शनही केले जात आहे. मात्र, अल्पवयीन मुला-मुलींचे विशेषत मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल तक्रारींवरून दिसत आहे. चालू वर्षातील ११ महिन्यांत १०५ गुन्हे पोक्सोअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. यात ५२ गुन्हे लैंगिक शोषणाचे असून इतर ४९ गुन्हे विनयभंग तर ४ गुन्हे इतर आहेत.
अनेक पालक सामाजिक बदनामी, भीतीपोटी पोलिस ठाण्याची पायरी चढत नसल्याचेही सांगितले जाते. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नात्यातील किंवा ओळखीतील व्यक्तीच आरोपी असल्याचेही दिसून आले आहे. दाखल गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांकडून अटक करून कारागृहात खडी फोडायलाही पाठविले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देखील झाली आहे, हे तितकेच खरे.
कायद्याची जरब नसल्याने नराधमांचे फावते, कठोर शासन हवे... मागील काही वर्षांपासून महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे. पोलिसांना वरिष्ठांचे आदेश आले, की त्यांनाही शांत बसावे लागते. राजकीय हस्तक्षेपांमुळे खाकी वर्दीला आपला दंडुका खाली घ्यावा लागतो. यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. परिणामी, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची जनसामान्यांची भावना आहे. जिल्ह्यात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते. महिला, शाळकरी मुलींवर अत्याचार, बलात्कार केले जात आहेत. मात्र, अशा घटना रोखण्यास सरकार, गृहखाते अपयशी ठरले आहे. कायद्याचा वचक नसल्यामुळे, असे प्रकार घडताहेत. असे कृत्य केल्याने थोडीफार शिक्षा होईल, असे आरोपींना वाटते.
पोक्सोअंतर्गत गुन्ह्यात काय शिक्षा ?
- पोक्सोअंतर्गत दाखल विविध गुन्ह्यांत दोषसिद्धता झाली तर तीन वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. गुन्हा गंभीर असेल, दोष सिद्धता झाली तर मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
- काही प्रकरणात आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो. पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांची माहितीही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विविध शिबिरांच्या माध्यमातून दिली जात आहे.
पोक्सोअंतर्गत ०५ विनयभंगाचे दाखल गुन्हेजानेवारी - ५फेब्रुवारी - ८मार्च - ३एप्रिल - ५मे - ४जून - ३जुलै - ५ऑगस्ट - ५सप्टेंबर - ३ऑक्टोबर - ३नोव्हेंबर - ५