राज्यात २८ हजार ग्रामपंचायती : नागरिकांना होणार सुविधाप्रफुल्ल लुंगे - सेलूतंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ येत असताना ग्रामपंचायती यात मागे राहू नये, बदलत्या जगाचा वेध घेता यावा तसेच माहिती तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेत काम अधिक गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करता यावे या उदात्त हेतूने आगामी काळात देशातील ग्रामपंचायती, आॅप्टिकल फायबर नेटवर्कने, ब्रॉडबॅँड इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडण्यात येणार आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना त्यामुळे उच्च क्षमतेची आणि उच्च दर्जाची ब्रॉँडबॅँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे. यात जिल्ह्यातील ५१७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आधुनिक सुविधेमुळे राज्यात सुरू असलेल्या ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत (संग्राम) या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस गती येणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्राने भारत ब्रॉडबॅँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. या अंतर्गत देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ही ब्रॉडबॅँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेला राष्ट्रीय संपत्ती म्हणूनही जाहीर करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि भारत ब्रॉडबॅँड नेटवर्क लिमीटेड यांच्यात गत वर्षी त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. ई-पंचायत कार्यक्रमांतर्गत राज्यात संग्राम अर्थात संगणीकृत ग्रामीण महाराष्ट्र या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद सर्व पंचायत समिती आणि जवळपास २८ हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या आहेत. यापैकी २० हजार गावांमध्ये ई-बॅँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून अशी सेवा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.या आधुनिक प्रणालीमुळे गावखेडेही आता हायटेक होणार असल्याने महात्मा गांधीच्या स्वप्नातील खेड्यांचे चित्र निर्माण होत असल्याचा प्रत्यय येवू लागला आहे. ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती ब्रॉडब्रँडने जोडणार
By admin | Updated: September 11, 2014 23:44 IST