विभागाकडून केवळ नोटीसच : नागरिकांच्या गैरसोयीकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष वर्धा : आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत आहे. वर्धेत मात्र याच सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला दांडी बसत असल्याने ही सेवा जिल्ह्यात कोलमडण्याच्या स्थितीत आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत एकूण ४५ टक्के कर्मचाऱ्यांकडून मुख्यालयाला दांडी देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे या दांडीबाज कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे आरोग्य विभागाकडून बोलले जात आहे. नागरिकांना यथायोग्य आरोग्य सेवा मिळावी याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना राबविण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची असून कर्मचारी यातील महत्त्वाचा दुवा आहे; मात्र हे कर्मचारीच मुख्यालयी राहत नसल्याने या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे त्या कुचकामी ठरत आहे. मुख्यालयांना दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शोधण्याकरिता व त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत ४५ टक्के कर्मचारी कार्यालयाला दांडी मारत असल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्यांना नोटीसी बजावण्यात आल्या; मात्र त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. या नोटीसी त्यांच्याकडून सहज घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करावी असा विचार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाच्या नोटीसींना हे कर्मचारी धजावत नसल्याने आता त्यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची करवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईकडे साऱ्यांचे लक्ष आहे.(प्रतिनिधी) वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. ते भरण्याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयात वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने कर्मचारीही पूर्ण वेळ प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबत नाही. त्यांच्याकडून येथे कामांकडे दुर्लक्ष होते. यामुळे ही रिक्त पदे कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर येत असल्याचे दिसत आहे.
आरोग्य विभागातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी
By admin | Updated: October 6, 2016 00:35 IST