बँकेतील घटना : खराब नोटा असल्याची बतावणी वर्धा : बॅकेतून काढलेल्या रकमेतील नोटा खराब असल्याची बतावणी करून वृद्धाला ४७ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याची घटना शनिवारी दुपारी सिव्हील लाईन परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडियात घडली. या प्रकरणी खुशाब कावळे (५९) रा. गजानननगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.पोलीस सूत्रानुसार, खुशाब कावळे हे स्टेट बँकेत रक्कम विड्रॉल करण्याकरिता गेले होते. त्यांनी बँकेतून एक लाख रुपयांची रोकड विड्रॉल केली. काढलेली रक्कम मोजत असताना त्यांच्याजवळ दोन युवक आले. या दोन युवकांनी खुशाब यांना त्यांच्याकडे आलेल्या नोटा खराब असल्याची बतावणी केली. शिवाय त्या नोटा घेत त्या परत करण्याची ग्वाही दिली. यावर खुशाब यांनी त्यांच्याकडील नोटा या दोन युवकांच्या हवाली केल्या. ते दोघे नोटा परत आणण्याकरिता गेले, पण परत आलेच नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे खुशाब यांच्या लक्षात आले. यात त्यांना ४७ हजार ५०० रुपयांचा गंडा बसला. त्यांनी बँकेत या दोन युवकांचा शोध घेतला, मात्र त्यांना ते मिळून आले नाही. यावरून त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती मिळताच लगेच बँक गाठत चौकशी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास शहर ठाण्याचे निरीक्षक एम. बुराडे करीत आहेत.(प्रतिनिधी)
वृद्धाला ४० हजार ५०० रुपयांचा गंडा
By admin | Updated: January 3, 2016 02:34 IST