वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या तांत्रिक संघटनेमार्फत चालविल्या जात असलेल्या वीज बिल भरणा केंद्रांतर्गत २ ते २३ मार्च या काळातील २२ लाख ४४ हजार ३४५ रुपयांचा भरणाच केला नसल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट येथे उघडकीस आला. या प्रकरणी तांत्रिक सोसायटीचे अध्यक्ष रमेश सायंकाळ याच्यावर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.वीज वितरणच्या तांत्रिक संघटनांमार्फत जिल्ह्यात सर्वत्र वीज बिल भरणा केंद्र कंत्राटी पद्धतीने चालविली जातात. ग्राहकांनी भरलेली वीजबिलाची रक्कम तात्काळ त्याच दिवशी बँकेत भरावी लागते. हिंगणघाट येथे विद्युत तांत्रिक कामगार संस्थेद्वारे वीज बिल भरणा केंद्र चालविले जाते. रोजच्या रोज जमा झालेली रक्कम बँकेत भरून त्याची पावती दररोज सोसायटीला, उपविभागीय व विभागीय कार्यालयात पाठविला जाते. परंतु २ ते २३ मार्च या काळातील २२ लाख ४४ हजार ३४५ रुपयांच्या पावत्या विभागीय कार्यालयात जमाच न झाल्याचे लेखा विभागाच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती हिंगणघाट एमएसईबी विभागाला दिली. येथील कार्यकारी अभियंता वैद्य यांनी वीज बील भरणा केंद्रातील कर्मचारी पचारे आणि कारवटकर यांना बोलावून थकित बिलाबाबत चौकशी केली असता त्यांनी सर्व बिले सोसायटीचे अध्यक्ष रमेश सायंकाळ यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सायंकाळ यांना बोलावून पावत्यांसंदर्भात विचारणा करून त्या लवकरात लवकर जमा करण्याचे सांगितले. मात्र ती भरण्यात न आल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर सिरसे यांनी पोलीस ठाण्यात रमेश सायंकाळविरुद्ध तक्रार दाखल केली. सायंकाळविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. (शहर प्रतिनिधी)
वीज बिल भरणा केंद्रात २२ लाखांचा अपहार
By admin | Updated: March 26, 2015 01:45 IST