चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले गेले. मात्र, जानेवारी महिन्यात शहर-जिल्ह्यात एक दोन नव्हे, तर तब्बल १५ जणांचा अपघाती बळी गेला आहे.
जानेवारी २०२४ मध्ये एकूण २९ अपघात झाले होते. त्यात १० जणांचा बळी गेला होता. जानेवारी २०२५ मध्ये ४० अपघात झाले असून, १५ जणांचा बळी गेला आहे. यात गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अपघात अन् बळींची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत. एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून, रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खडे, गतिरोधक आदी कारणांमुळे अपघात होत होते. मात्र आता मानवी चुकांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असल्याचे दिसून येत आहे.
मानवी चूका कारणीभूत...मानवी चुकांमुळे अपघात वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणांमुळे अपघात होऊ लागले आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. परंतु, याच महिन्यात १५ जणांचा अपघातात बळी गेला. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हेतर, वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे.
जानेवारीची आकडेवारी एकूण अपघातएकूण अपघात मृत्यू किरकोळ गंभीर४० १५ १५ १०
ही आहेत अपघाताची कारणेचुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गतवर्षीपेक्षा वाढजिल्ह्यातील राज्यमार्ग तसेच महामार्गावर झालेल्या अपघातांत यंदाच्या जानेवारीत वाढ झाली आहे. गतवर्षी जानेवारी २०२४ मध्ये २९ अपघात झाले होते. यात १० जणांचा मृत्यू झाला होता. तर १० जण गंभीर आणि दोन जण किरकोळ जखमी झाले होते. जानेवारी २०२५ मध्ये यात ११ अपघातांची वाढ झाली असून, तब्बल ४० अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.