1,842 कोविड बाधितांच्या उपचारापोटी दिले 1.44 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 05:00 AM2021-04-12T05:00:00+5:302021-04-12T05:00:11+5:30

कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर अधिग्रहित केलेल्या दोन्ही कोविड रुग्णालयातून प्रत्येक कोरोना बाधिताला नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील २२ हजार २२६ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी १९ हजार ५५ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत, तर ४९५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या कोविड बाधितांपैकी अनेकांवर अधिग्रहित केलेल्या कोविड रुग्णालयात उपचारही मिळाले.

1.44 crore for the treatment of 1,842 Kovid victims | 1,842 कोविड बाधितांच्या उपचारापोटी दिले 1.44 कोटी

1,842 कोविड बाधितांच्या उपचारापोटी दिले 1.44 कोटी

Next
ठळक मुद्देअधिग्रहित कोविड रुग्णालयांची प्रशासनाकडे थकली कोटींचे देयक

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ विषाणूची एन्ट्री होताच कुठलाही काळाबाजार न होता, प्रत्येक काेरोनाबाधिताला चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून  जिल्हा प्रशासनाने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय अधिग्रहीत केले. सध्याच्या कोरोनाकाळात ही दोन्ही कोविड रुग्णालये वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत असून, या दोन्ही रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने मार्च अखेरपर्यंत १ हजार ८४२ कोविड बाधितांच्या उपचारापोटी तब्बल १ कोटी ४४ लाख ४८ हजार ४७७ रुपये दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर अधिग्रहित केलेल्या दोन्ही कोविड रुग्णालयातून प्रत्येक कोरोना बाधिताला नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील २२ हजार २२६ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी १९ हजार ५५ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत, तर ४९५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या कोविड बाधितांपैकी अनेकांवर अधिग्रहित केलेल्या कोविड रुग्णालयात उपचारही मिळाले. परंतु,  जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ९०४ कोविड बाधितांच्या उपचारापोटी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाला ४५ लाख ५० हजार ४३७ रुपये, तर याच दोन महिन्यांच्या कालावधीत ९८३ कोविड बाधितांच्या उपचारापोटी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाला ९८ लाख ९८ हजार ४० रुपये दिले आहे. असे असले तरी नोव्हेंबर २०२० पासून कुठलेही देयक अदा न करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडे या दोन्ही कोविड रुग्णालयांची कोट्यवधीची देयके थकीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे सर्वच स्तरातून झाले होते स्वागत
१० मे रोजी वर्धा जिल्ह्यात कोविडचा पहिला रुग्ण सापडला. मे २०२० मध्येच वर्धा वगळता, इतर जिल्ह्यांमध्ये कोविड बाधितांना उपचार मिळून घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याचे पुढे आल्याने  तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी अधिग्रहित केलेल्या दोन्ही रुग्णालयांत प्रत्येक कोविड बाधिताला नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचा आदेश निर्गमित केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे त्यावेळी सर्वच स्तरांतून स्वागत झाले होते.

६१ रुग्णांची देयक रखडली
ऑक्टोबर महिन्यातील ४१ रुग्णांचे सेवाग्राम, तर २० रुग्णांचे सावंगी येथील रुग्णालयाने अनुक्रमे ७ लाख २३ हजार ८०२ आणि ४ लाख ३२ हजार ९४१ रुपयांचे देयक जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत जिल्हा प्रशासनाला सादर केली आहे. परंतु, या देयकांवर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे बोलले जात आहे.

जेवणाचा दिला जातोय १५० रुपये मोबदला
दोन्ही रुग्णालयांत कोविड बाधितांना रुग्णालय प्रशासनाकडून जेवण दिले जात असले तरी या जेवणाचा मोबदला शासकीय नियमाला अनुसरून १५० रुपयांप्रमाणे जिल्हा प्रशासन रुग्णालयांना देत असल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही कोविड रुग्णालयात प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. या दोन्ही रुग्णालयांना कोविड बाधितांच्या उपचारापोटी देण्यात येणारे देयक शासकीय नियमानुसार दिले जात आहे.
- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

 

Web Title: 1.44 crore for the treatment of 1,842 Kovid victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.