उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी गाडी एका भितींला धडकली. या अपघातात नवरदेवासह आठ जणांचा मृत्यू झाला. जुनावरी येथील मेरठ-बदायूं रस्त्यावर हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
संभलच्या जुनावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगोविंदपूर गावातील रहिवासी सुखराम यांनी बदायूं जिल्ह्यातील सिरसौल गावातील तरुणीशी आपल्या मुलाचे लग्न ठरवले. शुक्रवारी संध्याकाळी नवरदेवाकडील मंडळी सिरसौल गावाला जात होते, ज्यात नवरदेवासह एकूण १० जण होती. परंतु, वाटेतच गाडी जुनावई येथील जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी कसेबसे जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी नवदेवासह आठ जणांना मृत घोषित केले. तर, दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सूरज पाल (वय, २०) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. तर, त्याचे वडील देवा, बहीण कोमल (वय, १५), चुलती आशा (वय, २६), चुलत बहीण ऐश्वर्या (वय, ३) चुलत भाऊ सचिन (वय, २२), सचिनची पत्नी मधू (वय, २०) चुलत भाऊ गणेश (वय, २) आणि गाडीचालक रवी (वय, २८) अशी मृतांची ओळख आहे.
अपघाताची माहिती मिळताच लग्नाच्या घरात गोंधळ उडाला. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले. संभलचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितले की, चालक वेगान गाडी चालवत होता. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.