जिवंतपणीच स्वत:चा तेरावा घालणाऱ्या व्यक्तीचा २ दिवसांत मृत्यू; नेमकं काय प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:25 PM2024-01-17T13:25:41+5:302024-01-17T13:26:44+5:30

मृत्यूपूर्वी हाकीम सिंह यांनी भाऊ आणि पुतणे घर, जमीनीसाठी त्यांना मारहाण करायचे असं सांगितले.

Hakim Singh passed away who did terava programme when alive | जिवंतपणीच स्वत:चा तेरावा घालणाऱ्या व्यक्तीचा २ दिवसांत मृत्यू; नेमकं काय प्रकरण?

जिवंतपणीच स्वत:चा तेरावा घालणाऱ्या व्यक्तीचा २ दिवसांत मृत्यू; नेमकं काय प्रकरण?

एटा - उत्तर प्रदेशातील एटा इथं जिवंतपणीच स्वत:च्या मृत्यूनंतरचे विधी पार पाडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या तेराव्याला शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू होती. परंतु कुणाला हा व्यक्ती इतक्या लवकर जाईल याची कल्पना नव्हती. २ दिवसांपूर्वी लोकांना हसत हसत स्वत:च्या तेराव्याचे भोजन देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनं गावकरी हैराण झाले आहेत. एटा येथील रहिवासी हाकिम सिंह यांनी १५ जानेवारीला स्वत:चे मृत्यूनंतरचे विधी उरकून घेतले. 

जिवंतपणी पिंडदान आणि तेरावा करण्यामागे हाकीम यांनी म्हटलं की, माझा कुटुंबावरील विश्वास उडाला आहे. मृत्यूनंतर ते प्रथेनुसार माझे विधी करतील की नाही यावर मला शंका आहे. त्यासाठी जिवंतपणीच मी या सर्व विधी माझ्या डोळ्यादेखत पूर्ण करून घेतल्या. आता या प्रकाराच्या तिसऱ्या दिवशी हाकिम सिंह यांचे निधन झाले आहे. कदाचित हाकीम यांना त्यांच्या मृत्यूचे संकेत मिळाले असावेत असं लोकांनी म्हटलं. हाकीम यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब आणि गावकऱ्यांनी हाकीम यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले. 

काही दिवसांपूर्वी मुहल्ला परिसरातील मुंशीनगर येथे राहणाऱ्या हाकीम सिंह यांनी कार्ड छापून त्यांच्या तेराव्याचे निमंत्रण गावकऱ्यांना दिले होते. या कार्यक्रमात जवळपास ८०० लोक सहभागी झाले. याआधा हाकीम यांनी तेराव्यासाठी लागणाऱ्या विधी पूर्ण केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हाकीम सिंह यांनी बिहारच्या एका युवतीसोबत लग्न केले होते. परंतु काही काळ एकत्र घालवल्यानंतर पत्नी हाकीम यांना सोडून पुन्हा माहेरी निघून गेली. हाकीम यांना अपत्य नसल्याने नातेवाईकांनी त्यांची जमीन आणि इतर मालमत्ता यावर कब्जा केला. कुटुंब आणि नातेवाईकांच्या अशा वागण्याने हाकीम सिंह खूप चिंतेत जीवन जगत होते. 

मृत्यूपूर्वी हाकीम सिंह यांनी भाऊ आणि पुतणे घर, जमीनीसाठी त्यांना मारहाण करायचे असं सांगितले. या मारहाणीत अलीकडेच हाकीम सिंह यांचा हातही मोडला होता. कुटुंबासोबत वाद आणि जगण्याची उमेद नसलेल्या हाकीम सिंह यांना मृत्यूनंतर आपल्यावर प्रथेनुसार विधी पार पाडतील का अशी चिंता होती. त्यातूनच जिवंतपणी हाकीम सिंह यांनी त्यांचा तेरावा उरकून घेतला. या तेराव्याच्या जेवणासाठी ८०० लोकही सहभागी झाले. या प्रकाराची चर्चा सगळीकडे पसरली होती. त्यातच या घटनेच्या २ दिवसांनी हाकीम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Web Title: Hakim Singh passed away who did terava programme when alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.