देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आज प्रयागराज महाकुंभमेळ्यात पोहोचले. येथे त्यांनी इस्कॉन मंदिरात प्रार्थना केल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वापट केले. या महाकुंभ मेळ्यात, इस्कॉन आणि अदानी समूह संयुक्तपणे महाप्रसाद सेवा देत आहेत, ही सेवा महाकुंभाचे पहिले अमृत स्नान अर्थात १३ जानेवारी रोजी सुरू झाली आणि २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल.
गौतम अदानी सकाळी ८ वाजता चार्टर विमानाने अहमदाबादहून निघाले आणि सकाळी ९:४५ च्या सुमारास प्रयागराजला पोहोचले. यानंतर ते कारने महाकुंभ नगरच्या सेक्टर १८ मध्ये असलेल्या इस्कॉन व्हीआयपी टेंटकडे पोहोचले. येथून ते सेक्टर १९ मधील इस्कॉनच्या महाप्रसाद सेवा स्वयंपाकघराकडे गेले आणि येथील इस्कॉन मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी यात्रेकरूंना प्रसादाचे वितरण केले.
महाकुंभमध्ये भाविकांना प्रसादाचे वितरण केल्यानंतर, गौतम अदानी महाकुंभ नगरातील सेक्टर ३ मधील व्हीआयपी घाटावर पोहोचले. त्यांनी येथे पुजाऱ्यांसोबत बोटीत बसून पूजा केली. या पूजेनंतर, ते झोपलेल्या अवस्थेत असलेल्या हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी जातील.
५ फेब्रुवारीला प्रयागराज येथे जाऊ शकतात मोदी -पंतप्रधान नरेंद्र मोदीही ५ फेब्रुवारीला प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संभाव्य दोऱ्यादरम्यान ते अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांचा आढावा घेण्याची आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान संगम परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. प्रशासनाने अधिकाऱ्यांना सर्व तयारी वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.