वांगी, पत्ताकोबी, फ्लॉवर, टोमॅटो स्वस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:22+5:302021-03-01T04:37:22+5:30

उस्मानाबाद : दरवर्षी उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरात वाढ होत असते. यंदा मात्र मुबलक पाणी व भाज्यांसाठी पोषक वातावरण ...

Eggplant, cabbage, cauliflower, tomato cheap | वांगी, पत्ताकोबी, फ्लॉवर, टोमॅटो स्वस्तच

वांगी, पत्ताकोबी, फ्लॉवर, टोमॅटो स्वस्तच

googlenewsNext

उस्मानाबाद : दरवर्षी उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरात वाढ होत असते. यंदा मात्र मुबलक पाणी व भाज्यांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक अधिक आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण होत असून, वांगी, पत्ताकोबी, फ्लॉवर, टाेमॅटोची मातीमोल दराने विक्री होत आहे. मात्र, उन्हाच्या झळा वाढू लागल्याने फळांना मागणी वाढत असल्याचे फळांच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. .

यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाले होते. परिणामी, प्रकल्पातील पाणीसाठ्यातही पाणीसाठा वाढला. मुबलक पाणीसाठा व भाज्यांसाठी पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड केली. त्यामुळे बाजारात मागील तीन महिन्यांपासून फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढत असल्याने भाज्यांचे दर उतरलेलेच आहेत. रविवारी आठवडी बाजारात कांदा ४०, शिमला मिरची, दोडका, कारले ३० ते ४०, हिरवी मिरची, गवार ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. बटाटा १५ ते २०, वांगी, टाेमॅटो १० ते १५ रुपयांनी, तर पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. मागील वर्षभर ८० ते १०० रुपये किलोने विक्री होणाऱ्या शेवग्याचे दर उतरले असून, शेवगा ३० ते ४० रुपये किलोने विक्री झाला.

तेलाचा भडका कायम

दिवाळी सणापासून खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होत आहे. पामतेल ११० रुपये, सोयाबीन तेल १३०, तर शेंगदाणा तेल १७० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मोहरी तेल १३०, तर सूर्यफूल तेल १४० ते १५० रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय, डाळींच्या दरातही वाढ होत आहे. हरभरा डाळ ६५, तूरडाळ १०५, मूगडाळ व उडीद डाळ ११० रुपये, मसूर डाळ ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस आहे.

मेथी कवडीमोल

पालेभाज्यांची आवकही मागणीच्या तुलनेत अधिक आहे. मागील पंधरा दिवसांत मेथीची जुडी १० रुपयास विक्री होत होती. आता मेथी १० रुपयांना ३ जुडी, कोथिंबीर १० रुपयास दोन जुडी, चुका, पालकाची जुडी ५ रुपयाप्रमाणे, तर शेपूची जुडी १० रुपयाने विक्री झाली.

पाणीदार फळांना मागणी

बाजारात द्राक्षे ७० ते ८०, संत्रा ६० रुपये, खरबूज ३० ते ४० रुपये किलो, टरबूज ४० ते ५० रुपये नग, शहाळे ३० रुपये नग, अननस ६० रुपये नगप्रमाणे विक्री होत आहे.

प्रतिक्रिया

मागील तीन महिन्यांपासून खाद्यतेलांचे दर वाढत आहेत. त्यातच आता मूग व तूरडाळीचे भाव वाढल्याने सामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. भाज्यांचे दर आवाक्यात असल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

ग्राहक, मारुती माने

खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होत आहे. पामतेल, सोयाबीन तेल व शेंगदाणा तेलाचे दर ५ ते १० टक्क्यांनी

वाढ झाली आहे. तूरडाळ व मूगडाळही महागली आहे.

मच्छिंद्र तुंडरे, किराणा व्यावसायिक

मागील चार-पाच दिवसांपासून ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे पाणीदार फळांना ग्राहकांची पसंती आहे. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, खरबूज, टरबूज, संत्र्याचे दर वाढले आहेत. सफरचंदाची आवक कमी असल्याने त्याचाही भाव वाढला आहे.

वली शेख, फळविक्रेते

Web Title: Eggplant, cabbage, cauliflower, tomato cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.