डोंगरदऱ्यांमध्ये फिरण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक हिमाचल प्रदेशाचा दौरा करतात. इथे ते कुल्लू-मनाली, शिमलामध्ये एन्जॉय करतात. पण आज आम्ही तुम्हाला येथील एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, जिथे फिरल्यानंतर तुम्ही कुलू-मनालीला सुद्धा विसराल. इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर या ठिकाणाला फार महत्व आहे. १४०० वर्ष जुनं हे ठिकाण आधी अनेक राजा-राणींचं आवडतं ठिकाण होतं. तुम्हीही या १४०० वर्ष जुन्या ठिकाणाला भेट द्याल तर तुमच्यासाठी हा अनुभव अविस्मरणियच ठरेल.
छोटसं गाव आहे नग्गर
शिमला किंवा कुलू मनाली फिरायला येणारे पर्यटक एका दिवसासाठी नग्गरला भेट देऊ शकतात. पटलिकुहलपासून काही अंतरावरच हे ठिकाण आहे. इथे फिरण्यासाठीही तुम्हाला अनेक पर्याय आहेत. तसेच हे ठिकाण फार मोठं नसल्याने तुम्ही इथे पायी फिरू शकता. पण जर तुम्हाला या ठिकाणाची सुंदरता जवळून बघायची असेल आणि अनुभवायची असेल तर इथे कमीत कमी दोन रात्री थांबावं. चला जाणून घेऊ येथील खासियत...
नग्गरचा जुना महाल
नग्गरमध्ये बघण्यासाठी खूप गोष्टी आहेत. त्यात सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे येथील महाल. हा शानदार आणि आलिशान महाल साधारण ५०० वर्ष जुना आहे. हा महाल आता हिमाचल प्रदेश सरकारच्या देखरेखीखाली आहे. इथे तुम्ही थांबूही शकता.
निकोलस रोरिट आर्ट गॅलरी
रशियाचे महान चित्रकार आणि कलाकार निकोलस रोरिच जेव्हा नग्गरला आले होते, तेव्हा येथील सुंदरता पाहून ते मोहित झाले होते. त्यावेळी त्यांनी काढलेल्या अनेक सुंदर कलाकृती या गॅलरीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला चित्रकलेची आवड असेल तर तुम्ही इथे भेट देऊ शकता.
गौरी-शंकर मंदिर
नग्गरच्या महालापासून काही अंतरावरच एक मंदिर आहे. जिथे शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे मंदिर फारच सुंदर असून येथील कलाकृती बघण्यासारख्या आहेत.
जाना धबधबा
जर तुम्हाला डोंगरदऱ्यांमध्ये वेळ घालवणं आवडत असेल तर तुम्ही येथील जाना गावात जाऊ शकता. इथे एक सुंदर धबधबा असून हा बघताना तुम्हाला 'स्वर्गात' आल्याचा भास होईल.
कसे पोहोचाल?
नग्गरला पोहोचण्यासाठी सर्वात चांगला पर्याय रस्ते मार्ग आहे. दिल्लीहून हिमाचलला जाणाऱ्या बसेसमधून तुम्ही पटलिकुहल येथे जाऊ शकता. तेथून टॅक्सी किंवा स्थानिक बसेसमधून तुम्ही नग्गरला पोहोचू शकता. तसे तर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये इथे फिरायला जाऊ शकता. मात्र, इथे जाण्यासाठी सर्वात चांगला कालावधी सप्टेंबर ते नोव्हेंबरचा मानला जातो.