(Image Credit : Onmanorama - Malayala Manorama)
पावसाळ्यात फिरण्याची मजा भारीच असते... आणि पावसाच्या या मस्त आणि धुंद वातावरणात जर मित्रांची साथ मिळाली तर बात काही औरच... तुम्हीही जर पावसाळ्यात मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी काही खास प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास ऑप्शन्स देऊ शकतो. या ठिकाणी जाऊन तुम्ही पावसाची खरी मजा अनुभवू शकता.
मुन्नार
पावाळ्यात मित्रांसोबत फिरण्यासाठी केरळमधील स्वर्ग असलेलं मुन्नार बेस्ट डेस्टिनेशन ठरतं. मान्सूनमध्ये येथील निसर्गसौंदर्य अगदी खुलून येतं. मुन्नारमध्ये चारही बाजूंना पसरलेली हिरवळ अत्यंत अल्हाददायी असते. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर मुन्नारमधील इको पॉइंट, एरविकुलम नॅशनल पार्क आणि कुंडला तलाव यांसारख्या विशेष ठिकाणांना भेट देऊ शकता.
शोजा
हिमाचल प्रदेशमध्ये शोजा नावाचं एक छोटसं गाव आहे. या ठिकाणांच्या चारही बाजूंना डोंगर असल्यामुळे याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. मित्रांसोबत मान्सूनमध्ये शोजा फिरण्याचा प्लॅन करू शकता. याशिवाय येथील वॉटरफॉल पॉईंट पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतं. तुम्ही येथे आल्यानंतर जणू काही निसर्गाच्या कुशीतच बसले असल्याचा भास होईल.
कक्काबे
कर्नाटकमधील कक्काबेमध्ये जाऊन तुम्ही मित्रांसोबत मान्सूनचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला निसर्गसौंदर्य जवळून अनुभवायचे असेल तर हे ठिकाण उत्तम ठरतं. येथे पोहोचल्यानंतर तुम्हाला निसर्गाचे अनेक अद्भूत नजारे पाहायला मिळतील.
देवप्रयाग
अलकनंदा आणि भागीरथी यांचा महासंगम असलेलं देवप्रयाग संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. मित्रांसोबत मान्सूचा आनंद घेण्यासाठी देवप्रयाग उत्तम ठिकण ठरेल. देवप्रयागबाबत असं सांगितलं जातं की, अलकनंदा नदी वाहताना अत्यंत कमी आवाज करते आणि भागीरथी नदी जास्त आवज करत वाहते. त्यामुळे भागीरथी नदीला सासू आणि अलकनंदा नदीला सून असं म्हटलं जातं.
माजुली
मित्रांसोबत मान्सूनमधील माजुलीची ट्रिप प्लॅन करू शकता. असा दावा करण्यात येतो की, माजुली जगभरातील सर्वात मोठं नदीने व्यापलेलं बेट आहे. जर तुम्हाला या ठिकाणी भेट देण्याची इच्छा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणी भेट देऊ शकता.