सुट्टीच्या दिवसात फिरण्यासाठी वेगळ्या आणि हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचवू शकतो. अनेकदा कामाच्या धावपळीपासून दूर असणाऱ्या आणि मनाला शांती देणाऱ्या ठिकाणाच्या आपण शोधात असतो. तुम्हीही अशाच ठिकाणाच्या शोधात असाल तर, तिबेटच्या काही खास ठिकाणांना भेट देऊ शकता. येथील प्रत्येक ठिकाणं आपली संस्कृती आणि सौंदर्याची ग्वाही देत असतात. तिबेटची ही ठिकाणं तुम्हाला आपल्या सौंदर्याने नक्कीच भूरळ घालतील. जाणून घेऊयात तिबेटमधील काही खास ठिकाणांबाबत...
बरखोर स्ट्रीट
तुम्हाला फिरण्यासोबत शॉपिंग करण्याचीही आवड असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. येथे 120 पेक्षा जास्त हॅन्डक्राफ्टची दुकानं असून 200 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत.
तिबेट म्यूझिअम
नॉरबुलिंकाच्या दक्षिण-पूर्वमध्ये स्थित असलेलं तिबेट म्युझिअम येथील सर्वात पहिलं आधुनिक म्युझिअम आहे. येथे तुम्हाला शाही मोहर, विविध योध्यांनी दिलेल्या भेटवस्तूंसोबतच येथील संस्कृती आणि तिबेटी भाषेतील साहित्य मिळेल. येथे तुम्हाला तिबेटच्या लोकसंस्कृतीची झलक पाहायला मिळेल.
पोटाला पॅलेस
पोटाला पॅलेस तिबेटची राजधानी ल्हासाच्या लाल डोंगरांमध्ये वसलेलं आहे. याची स्थापना सम्राट सोंगसन गेम्पो यांनी सातव्या शतकामध्ये केली होती. या पॅलेसमध्ये दोन बिल्डिंग आहेत. व्हाइट पॅलेस प्रशासनिक बिल्डिंग आणि रेड पॅलेस धार्मिक बिल्डिंग आहे. या पॅलेसची खासियत म्हणजे, येथील सर्व स्तूपांवर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
जोखांग मंदिर
जोखांग मंदिर तिबेटमधील लोकांच्या आस्थेचं केंद्र आहे. जोखांग मंदिर जगभरातील हजारो पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करत असतं. येथील मठांमध्ये प्रेवश केल्यानंतर मनाला शांती मिळते.