हाताच्या पंजातून फिरायचंय?, ढगात झुलायचंय?; मग 'या' देशात एकदा जायलाच हवं!

By किरण अग्रवाल | Published: December 22, 2023 12:13 PM2023-12-22T12:13:52+5:302023-12-22T12:17:17+5:30

सुमारे 1945 पर्यंत फ्रेंच या देशात राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील भव्य दिव्य इमारतींवर फ्रेंच वास्तूशास्त्र, कलेच्या खुणा प्रामुख्याने आढळतात.

explore vietnam bana hills, golden bridge, fantasy park and many more tourist spots | हाताच्या पंजातून फिरायचंय?, ढगात झुलायचंय?; मग 'या' देशात एकदा जायलाच हवं!

हाताच्या पंजातून फिरायचंय?, ढगात झुलायचंय?; मग 'या' देशात एकदा जायलाच हवं!

>> किरण अग्रवाल

विमानात बसून आकाशात वा ढगात फिरण्याचा आनंद आपणास घेता येतो, त्याप्रमाणे झोपाळ्यात बसल्यासारखे ढगात झुलायचे असेल तर त्यासाठी व्हिएतनाममधील बाना हिल्सवरच जायला हवे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या येथील  केबल कारमध्ये बसून कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा विलक्षण अनुभव काय असतो, हे तो अनुभव घेणाऱ्यासच कळू शकेल. 

पर्यटकांना रोप -वे / केबल कारच्या प्रवासाची नवलाई आता राहिलेली नाही. आपल्याकडे भारतातही अनेक ठिकाणी केबल कारने प्रवास करण्याची व्यवस्था झालेली आहे, परंतु व्हिएतनाममधील बाना हिल्स या समुद्रसपाटीपासून 1487 किलोमीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी केबल कारने जाताना ढगात झुलण्याचा जो अनुभव येतो तो अवर्णनीयच ठरतो. एका केबिनमध्ये सहा ते आठ प्रवासी बसू शकतील अशा सुमारे शंभरेक केबिन्सद्वारे एका तासात जवळजवळ सहा हजार पर्यटकांची वाहतूक येथे केली जाते. तब्बल 16 किलोमीटर लांबीचा हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पार पडतो. जमिनीवरून निघताना प्रारंभी नद्या नाले, खालील रम्य परिसर न्याहाळता येतो व ढगात झेपावल्यावर आपणच स्वतःला हरवून बसतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या विविध 4 कॅटेगरीत येथील केबल कारची नोंद झाल्याची माहिती आमच्या गाईडने दिली. 

व्हिएतनाममध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांचे शासन होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या उन्हाळी सुटीसाठी 'बाना हिल्स'चा शोध घेऊन आरामाची जागा विकसित केली. सुमारे 1945 पर्यंत फ्रेंच या देशात राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील भव्य दिव्य इमारतींवर फ्रेंच वास्तूशास्त्र, कलेच्या खुणा प्रामुख्याने आढळतात. 'सन वर्ल्ड'ने डोंगर न पोखरता अतिशय अप्रतिमपणे या हिल्सचा विकास करून हाताच्या पंजातून जाणारा 'गोल्डन ब्रिज' साकारताना 'फ्रेंच व्हिलेज' जतन केले आहे. या गोल्डन ब्रिजवर फोटो काढणे प्रत्येक पर्यटकांसाठी संस्मरणीय ठरत असते, परंतु याठिकाणी कधी कधी पाऊस व वाऱ्याचा वेग इतका असतो की स्वतःला व हातातील कॅमेरा सांभाळणे कसरतीचे ठरते. त्यामुळे या ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्यांनी रेनकोट घेऊन जाणे विसरू नये. असे एकदा वापरून फेकून देण्यासारखे रेनकोट्स तेथेही विकत उपलब्ध असतात. छत्री असून उपयोगाची नसते, कारण वाऱ्याच्या वेगामुळे ती उघडताच मोडून, उडून गेल्याखेरीज राहात नाही. 

व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल!

दुचाकींची गर्दी, हिंदी गाणी अन् आदरातिथ्य... 'या' देशात परकेपण वाटतच नाही!

अजबच! एक असा देश, जिथे आनंदाला कुलूप लावून 'लॉक' केलं जातं...

हिल्सवर बहुमजली 'फॅन्टसी पार्क'ही विकसित करण्यात आला असून त्यात सांस्कृतिक शो, 360 सिनेमा, बॅक टू जुरासिक, डिजिटल गेम्स आदी संपूर्ण दिवस कमी पडावा इतक्या गोष्टी पाहण्या व खेळण्यासाठी आहेत. या ठिकाणी पोहोचल्यावर तेथील निसर्गसानिध्यात पर्यटक हरवून बसतात व पुन्हा खाली, म्हणजे ज्या जमिनीवरून केबल कारने हिल्सवर आपण आलेले असतो तेथून उतरण्याची इच्छाच होत नाही. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षरशः हजारो पर्यटक येथे प्रतिदिनी भेट देतात, पण ना केबल कारसाठी वेटिंग करावे लागत; ना कुठे कशासाठी रांगेत उभे राहावे लागत. जागोजागी स्वयंचलित जिने आहेत, त्यामुळे थकायला होत नाही. बरे आपल्याकडे अशा ठिकाणी शिस्त पाळा हे सांगण्यासाठी जागोजागी दंडुके घेऊन सुरक्षारक्षक उभे दिसतात, परंतु तेथे तेही कुठे आढळत नाहीत. सीसीटीव्हीच्या निगराणीत सारे शिस्तीत राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे, बाना हिल्सवरचे सार्वजनिक स्वच्छतागृह भल्या मोठ्या पेंटिंग्स व आकाश कंदीलांनी सजलेली आहेत, त्यामुळे येथील सार्वजनिक स्वच्छतागृह इतके भारी तर बाकी काय विचारायचे? असे कौतुकोद्गार बाहेर पडल्याखेरीज राहत नाहीत. 

(कार्यकारी संपादक, लोकमत अकोला)

Web Title: explore vietnam bana hills, golden bridge, fantasy park and many more tourist spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.