केरळ एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाने भरभरून सुंदरता बहाल केली आहे. त्यामुळेच इथे पर्यटकांची सतत गर्दी बघायला मिळते. डोंगर, जंगलं, तलाव आणि इतरही खूपकाही इथे तुम्हाला बघायला मिळतं. तशी तर अनेकांनी केरळमधील वेगवेगळ्या ठिकाणांची सैर केली असेलच. पण आज आम्ही तुमच्यासाठी केरळमधील काही ऑफबिट ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. इथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता.
मरारी बीच, अलप्पुजहा
समुद्र किनाऱ्यावर काही तुम्हाला चांगला वेळ घालवायचा असेल, एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही या बीचवर जाऊ शकता. मॉरीशस, थायलंडसारखाच सुंदर हा बीच आहे. या बीचला हॅमोक बीचही म्हटलं जातं. एका सर्व्हेनुसार, लोकांनी या बीचला जगातल्या पाच बेस्ट बीचपैकी एक मानलं आहे. मरारीपुरम हे मच्छिमारांचं गाव असून इथे होम स्टे ची सुद्धा सुविधा आहे. तसेच इथे तुम्ही व्हिलेज सफारीचाही आनंद घेऊ शकता.
कसे पोहोचाल?
इथे पोहोचणे फार कठीण नाहीये. मरारी बीच मरारीकुलम रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. तसेच तुम्ही अलप्पुजहा येथून ऑटो किंवा टॅक्सी घेऊनही इथे पोहचू शकता.
कुंडला, इडुक्की
मुन्नारच्या रस्त्याने जाताना तुम्हाला एक सुंदर ठिकाण दिसेल ते म्हणजे कुंडला. येथील कुंडला लेक या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करते. या लेकमध्ये तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता. मानवनिर्मित या लेकच्या आजूबाजूला हिरव्यागार चहाच्या बागाही आहेत. त्यामुळे तुम्ही जर मुन्नारला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडा वेळ काढून इथेही भेट द्या.
कसे पोहोचाल?
मुन्नारपासून काही किमी अंतरावर कुंडला लेक आहे.
अरीक्कल वॉटरफॉल, कोच्ची
केरळमधील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे अरीक्कल वॉटरफॉल. एर्नाकुलमहून हे ठिकाण बसने ३५ किमी अंतरावर आहे. आजूबाजूचे लोक इथे पिकनिकसाठी येतात. रबराच्या झाडांनी वेढलेल्या या वॉटरफॉलचा नजारा पावसाळ्या अधिकच दिलखेचक असतो. त्यामुळे इथे भेट देण्याचा तुम्ही प्लॅन करू शकता.
नेल्लियमपेथी, पलाक्कड
डोंगरांतून खाली येणारं पाणी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ डोळ्यांना एक वेगळाच आनंद देणारी आहे. असे नजारे केरळमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. पण काही लोकांना गर्दीपासून दूर राहणे पसंत असतं. अशांसाठी हे ठिकाण आहे. तुम्ही तुमची सुट्टी इथे आरामात आणि शांततेत घालवू शकता.
कसे पोहोचाल?
हे सुंदर हिलस्टेशन पालाक्कड रेल्वे स्टेशनपासून केवळ ५६ किमी दूर आहे. रेल्वे स्टेशनहून कॅब, बस आणि टॅक्सीने तुम्ही इथे पोहोचू शकता.
कुम्बालांगी, कोच्ची
आपल्यापैकी फार कमी लोकांना हे माहीत असेल की, कुम्बालांगी हे केरळमधील पहिलं इको टुरिज्म गाव आहे. इथे निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य तुम्हाला बघायला मिळतं. केरळच्या ऑफबिट डेस्टिनेशनमध्ये असलेलं हे ठिकाण तुमची ट्रिप नक्कीच यादगार करेल. हे गाव पाहिल्यावर असं वाटतं की, एखाद्या कलाकाराने त्याच्या रंगांनी हे गाव सजवलं आहे. इथे होमस्टे आणि गेस्ट हाऊस आहेत.
कसे पोहोचाल?
एर्नाकुलम रेल्वे स्टेशनपासून १४ किमीच्या अंतरावर हे गाव आहे. इथे पोहोचण्यासाठी वेगवेगळे पर्याय सहज मिळतील.