विविध उपक्रमांतून मूल्यशिक्षण देणारी जि.प.ची वसार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:58 PM2020-02-23T23:58:40+5:302020-02-23T23:58:48+5:30

ग्रामस्थांचाही सक्रिय सहभाग; कचऱ्यापासून खतनिर्मिती करून शाळा परिसरात फुलवली बाग, दोन वर्षे पटकावली स्काउट गाइड चॅम्पियनशिप

Zip Vasar School, which offers training in various activities | विविध उपक्रमांतून मूल्यशिक्षण देणारी जि.प.ची वसार शाळा

विविध उपक्रमांतून मूल्यशिक्षण देणारी जि.प.ची वसार शाळा

Next

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा आणि विविध उपक्रमांद्वारे मूल्यशिक्षणाचे धडे देऊन गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम जिल्हा परिषदेची वसार शाळा करत आहे. यासाठी ग्रामस्थांकडून मिळत असलेल्या सहकार्यामुळे या शाळेची ‘न भूतो न भविष्यती’ अशी वाटचाल सुरू आहे. कचरा समस्येवर मात करण्यासाठी त्यापासून खतनिर्मिती करून शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुलवलेली बाग सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील ही शाळा १९४९ मध्ये सुरू झाली. सध्या येथे पहिली ते आठवीपर्यंत ३०८ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेतील पदवीधर शिक्षिका मोहिनी बागुल या मुख्याध्यापक प्रमोद हेमा पाटील यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवत आहेत. बागुल म्हणाल्या की, यंदा विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा परिसरातच कचºयातून बाग फुलवली आहे. या बागेत विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे आणि फुलझाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये अळुकंद, टोमॅटो, वांगी, भोपळा, कांद्याची पात, पालक, वांगी अशा अनेक भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांचा वापर ते शालेय पोषण आहारात करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळतो.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचीही सवय लागत आहे. निसर्गाला आपण थोडे दिले तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो याची शिकवण त्यांना यातून मिळते. सध्याची मुले ही मातीपासून दुरावली आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा शेतीकडे वळा असा संदेश यातून देण्याचे काम शाळा करत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण आता जिल्ह्यातील सर्वच शाळांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

दर शनिवारी दप्तराविना शाळा भरते. या दिवशी विद्यार्थी टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, भेटकार्ड बनवणे, सुतळीच्या वस्तू बनवणे, गार्डन तयार करणे, शेतीच्या विविध पद्धतीची माहिती करून घेणे आदी गोष्टी केल्या जातात. ही शाळा आता संपूर्णपणे कचरामुक्त झाली आहे. यंदाची शिवजयंती गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत साजरी केल्याचेही त्या म्हणाल्या.

नशाबंदीसाठी जनजागृती
शाळेत सुरुवातीच्या काळात पायरीपर्यंत कचरा पसरलेला असायचा. त्यात दारूच्या बाटल्यांचा समावेश असे. शाळेची ही अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक घरांत जाऊन कचºयाविषयक जनजागृती करण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी महामंडळासोबत व्यसनमुक्ती करण्यासाठी विद्यार्थी काम करतात. लहानपणीच विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे धडे गिरवल्यास त्यातून एक सदृढ समाज घडण्यास मदत होईल, अशी शाळेची त्यामागे भावना आहे. शाळेला त्यांच्या या कामात जनसेवा मंडळाचे प्रमुख रवींद्र वायले व त्यांचे सहकारी मदत करतात. येथील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हापातळीवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत. अंबरनाथ तालुक्यातील मानाची ‘स्काउट गाइड चॅम्पियनशिप’ही दोन वर्षे पटकावून आदर्श निर्माण केला आहे.

विद्यार्थ्यांसाठी कलादालन
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे यासाठी कलादालन तयार केले आहे. या कलादालानत विद्यार्थ्यांनी बनवलेली टिश्यूपेपरची फुले, फेकलेल्या ग्लासपासून झुंबर, पेपरपासून सायकल, भेटकार्ड, फुलदाणी अशा विविध वस्तू ठेवल्या आहेत. टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहतो.

या सर्व उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणग्राहकता, सर्वांसोबत मिळून मिसळून वागणे, एकमेकांना सहकार्य करणे, अभ्यासात मागे असलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा विकास करणे हे गुण वाढीस लागतात. ‘सब बढे , सब पढे’ हे वाक्य सर्वार्थाने साध्य करण्याचे काम या शाळेतून होत आहे. - मोहिनी बागुल,
पदवीधर शिक्षिका

Web Title: Zip Vasar School, which offers training in various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा