उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमाविलेल्या महिलेला १ तास रुग्णवाहिका येण्याची प्रतीक्षा रेल्वे स्टेशनला करावी लागली. मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहीकाचा घोळ कायम राहिल्याने, महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील एका रुग्णाला तब्बल सहा तास १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळाल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. शासनाच्या आरोग्य विभागाने याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक व एका डॉक्टरांवर ठेवून त्यांना निलंबित केले. या घटनेनंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेचा घोळ कायम असल्याने, आरोग्य विभाग आता कोणावर कारवाई करते. याकडे सर्वांचे लक्ष लागले. शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला. या अपघातात महिलेने आपले दोन्ही पाय गमावले. या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र १ तासाच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका आली. तो पर्यंत महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या.
मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई सायन रुग्णालयात जखमी महिलेला हळविण्यासाठी पुन्हा डॉक्टर व नातेवाईकानी १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेला बोलाविले. मात्र एका तासाच्या प्रतीक्षेनंतरही रुग्णावाहीका आली नाही. अखेर खाजगी रुग्णवाहिकेने महिलेला सायन रुग्णालयात नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेला बोलाविले. यावेळी रुग्णवाहीकेच्या दराबाबत तू तू मै झाल्यावर, मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णावाहीका दिली. एकूणच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेचा घोळ कायम असून याबाबत शासन कारवाई करणार का? की गोरगरीब रुग्णाच्या जीवासी खेळणार? असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकानी यावेळी केला आहे. कोविड काळातील रुग्णवाहिका गेल्या कुठे? कोविड काळात महापालिका, रुग्णालय यांना देण्यात आलेल्या रुग्णवाहीका गेल्या कुठे? याच्या हिशेबाची मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून होत आहे.