लग्नाचे आमिष दाखवून महिलेला लुबाडले, संकेतस्थळावरून घेतली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 09:05 PM2017-11-15T21:05:42+5:302017-11-15T21:06:50+5:30
ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या भामट्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाडा (जिल्हा पालघर) येथील एका ३८ वर्षीय महिलेची सुशांतने आधी वरील संकेतस्थळावरून माहिती काढली. तिला लग्नासाठी होकार कळवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. येत्या काही दिवसांत लग्न करणार असल्यामुळे हे दोघेही ठाण्यात काही ठिकाणी फिरले. नंतर त्याने दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या रामचंद्रनगर येथील ‘सागर ज्वेलर्स’ या दुकानात नेले. तिथे दोघांनीही शीतपेय घेतले.
तिच्या शीतपेयात त्याने गुंगीचे औषध टाकून तिच्याकडील १६ ग्रॅम ५०० मिलिग्रॅम वजनाची सोनसाखळी तसेच इतर दागिने आणि १६ हजारांची रोकड असा एक लाख दोन हजार १०० रुपयांचा ऐवज तिच्या पर्समधून काढून त्याने ३० आॅक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पलायन केले. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने तिने अखेर याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सुशांतविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. लभडे हे अधिक तपास करत आहेत.