ठाणे: कोलशेत एअर फोर्सजवळील लोढा अमारामधील तळ अधिक २८ मजली इमारतीच्या कासा फ्रेस्को इमारतीच्या आठ क्रमांकाच्या विंगमधील २२ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत जयश्री ठाकरे(वय ३६ , २८०५/ २८ मजला) या महिलेचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत राजेंद्र तिवारी (२५०१/२५ वा मजला) यांनाही धुराचा त्रास झाला होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
लोढा अमारा, कोलशेत रोड येथील कासा फ्रेस्को या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर अचानक सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास (मालक: वैशाली कळव, भाडेकरु: व्यंकटेश) यांच्या घरामध्ये ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवांनानी तातडीने आग आटोक्यात आणण्याच प्रयत्न केला. मात्र, आगीच्या धुरामुळे राजेंद्र तिवारी आणि जयश्री ठाकरे यांना त्रास झाला. दोघांनाही तातडीने हायलँड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात केले. मात्र, जयश्री यांचा यात मृत्यू झाला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे कापूरबावडी पाेलिसांनी सांगितले. या इमारतीमधील ३७५ रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.