लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : ३ महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपी महिलेला बिहार राज्यातून अटक केली आहे. सदर बालकाची सुखरूप सुटका करण्यात मांडवी पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.
नालेश्वर नगर येथे राहणारे नबीउल्लाह चौधरी (३८) यांच्या ३ महिन्याच्या मुलाला १८ फेब्रुवारीला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मेव्हण्याची पत्नी किताबुननिशा हिने खेळण्यासाठी बाहेर घेऊन जाते असे सांगून पळवून नेले होते. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी महिलेने आईच्या अंगावरील दुध पित असलेल्या ३ महिन्याच्या लहान बालकाचे अपहरण केले असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिकारी व सपोनि बालाजी मुसळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि संदीप सावंत यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू केला.
पोलीस पथकाने तपास करुन सदर महिला आरोपी बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील सरमेरा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. प्राप्त माहितीच्या आधारे तपास टीम बिहारला गेली. नालंदा पोलीस घटकातील तांत्रिक विश्लेषण टिम आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मांडवी पोलिसांनी बिहार झारखंड सीमावर्ती दुर्गम भागातील ग्राम सुर्यचक, मिरनगर, सरमेरा गावातील अनेक घरांत तपास करून महिला आरोपीचा शोध घेतला. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातून ३ महिन्याच्या लहान बाळाची सुखरूप सुटका करून गुन्ह्याची उकल केली. आरोपी महिलेला बिहार येथून ताब्यात घेऊन मांडवीला आणून अटक केले आहे.
पोलीस तपासात आरोपी महिलेचे लग्न झालेले असून तीला तीन अपत्य आहे. आरोपी महिलेचे सरमेरा गावातील एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच्यासोबत नव्याने संसार करायचा होता म्हणून तीने लग्न झाल्याचे व तीन अपत्याची माहिती प्रियकराला सांगितली नव्हती. आरोपी महिलेने प्रेम संबंधातून ती तिच्या प्रियकरापासून गरोदर असल्याची खोटी माहिती फोनद्वारे कळवायची. आरोपी महिलेच्या नणंदेचे ३ महिन्यांचे बालक हे तीचे व तिच्या प्रियकराचेच असल्याचे प्रियकरास व्हिडीओ कॉलद्वारे भासवत असायची. आरोपीला प्रियकरासोबत नव्याने संसार करण्याची इच्छा असल्याने तिच्या नणंदेच्या ३ महिन्यांच्या लहान बालकाचे अपहरण करून ती बालकासह बिहार येथे निघून गेल्याची हकीकत निष्पन्न झाली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दतात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी मुसळे व संदीप सावंत, पोलीस हवालदार राजेंद्र फड, नितीन गलांडे, गजानन गरिबे, विशाल भगत, जगदीश नाणेकर, अमोल साळुंखे आणि शितल बिराजदार यांनी केली आहे.