संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -
बदलापूरमधील नामांकित शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आणि समाजमन उद्विग्न झाले. अखेर शिंदेचा एन्काउंटर करून निवडणुकीपूर्वी झटपट न्याय करून दाखवला. आता कल्याण पूर्वेत विशाल गवळी या सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त असलेल्या गुंडाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावली. या गवळीने निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना विजयी करण्याकरिता मतांचा रतीब घातलाय. त्यामुळे अक्षय शिंदेला लावला तोच न्याय लावून याचाही एन्काउंटर करणार की, त्याने लबाडीने प्राप्त केलेल्या मानसिक रुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्याच्या सुटकेसाठी सर्व सरकारी यंत्रणा राबवली जाणार हाच प्रश्न आहे.
बदलापूरमधील घटनेनंतर लैंगिक अत्याचाराच्या घटनांची मालिकाच ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाली. कल्याण पूर्वेत गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. लोकांनी निवडून दिलेला आमदारच पोलिस ठाण्यात बेधुंद गोळीबार करत असेल व तो तुरुंगात असतानाही केवळ इलेक्टिव्ह मेरिट या गोंडस नावाखाली त्याच्या पत्नीला उमेदवारी देऊन विजयी करण्याकरिता सत्ताधारी पक्ष राबत असेल तर गवळीसारख्या सत्ताधारी पक्षाच्या बगलबच्च्यांना कोणता संदेश जातो. कल्याण पूर्वेत वयात येत असलेल्या मुलींचे पालक चिंताक्रांत असतात. गुंडांनी या मुलींचा पाठलाग करणे, त्यांची छेड काढणे, विनयभंग करणे हे वरचेवर घडते. ज्या मुलींच्या पालकांना दुसरीकडे घर घेणे शक्य होते ते या ससेमिऱ्यातून सुटका करून घेतात, ही माहिती भाजपच्याच एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिली. कल्याणमधील किमान पाच ते सहा राजकीय पक्षाशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी मानसिक रुग्ण असल्याची प्रमाणपत्रे मिळविली आहेत. विनयभंगासारख्या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात गेली की, हे प्रमाणपत्र दाखवून ते कारवाई टाळतात. समजा पोलिसांनी लाजेकाजेस्तव कारवाई केली तर या गुन्हेगारांतर्फे उभे राहणारे निष्णात वकील याच प्रमाणपत्रांचा आधार घेऊन त्यांना सोडवतात. म्हणजे मानसिक रुग्ण असल्याची ही प्रमाणपत्रे महिला, मुलींशी गैरवर्तन करण्याचे जणू परवाने झाले आहेत.
महापालिका किंवा सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी पैशांच्या आमिषाने जर ही प्रमाणपत्रे दिली असतील तर ते धक्कादायक व गंभीर आहे. समजा खासगी डॉक्टरांनी असे परवाने दिले असतील तर त्यांनी ते कशाच्या आधारे दिले, याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. अशा डॉक्टरांची रवानगी कोठडीत झाली पाहिजे.
अक्षय शिंदे याची तीन लग्ने झाली होती. विशाल गवळीचीही तीन लग्ने झाली असून त्याच्या तिसऱ्या पत्नीने या गैरकृत्यात त्याची साथ दिली. शिंदे किंवा गवळी यांच्यासारख्या विकृतांना पटापट बोहल्यावर चढण्याकरिता, मुली कशा मिळतात हेही एक कोडे आहे.
ज्ञानपीठ विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे ग्रंथालीच्या ‘वाचक दिन’ सोहळ्यानिमित्त ठाण्यात आले तेव्हा म्हणाले की, सुशिक्षित माणसाकडून होणारी ही गुन्हेगारी कृत्ये पाहिल्यावर निरक्षर राहण्याचा प्रचार व प्रसार करायला हवा. नेमाडे यांच्या वक्तव्यातील उपहास अप्रस्तुत नाही.