कल्याण : स्वत:च्या पक्षाचे सूचक-अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदी निवडून आलेल्या सुनंदा कोट यांना मनसेने कारणे दाखवा नोटीस बजावली खरी, पण त्यांच्यावर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडल्याने राज ठाकरे आपल्या दौºयात हे सहकार्य रद्द करण्याचे आदेश देणार का, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक ५ जुलैला पार पडली. दहाही समितीवर महिला उमेदवारांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दहाही जणींची समित्यांवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. अ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट यांनीही अर्ज दाखल केला होता. या प्रभागात अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी पुरेसे सूचक व अनुमोदक नसताना कोट यांनी शिवसेनेच्या सहकार्याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांवर शिवसेनेचे गणेश कोट आणि हर्षाली थवील सूचक आणि अनुमोदक होते. हा अर्ज दाखल करताना कोट यांनी मनसेला अंधारात ठेवले, तर पालिकेतील मनसेचे पदाधिकारी असलेले विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही माहिती दिली नाही. त्यामुळे कोट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांनी खुलासाही केला. पण आजतागायत पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिक पदाधिकाºयांनी कोट यांना अभय दिल्याची चर्चा असताना राज ठाकरे हे सहकार्य ठेवणार की झिडकारणार या मुद्द्याची चर्चा सुरू आहे.>वाहतूककोंडीमुळेदौरा एक दिवस पुढेठाकरे हे गुरूवारी सायंकाळी डोंबिवलीत दाखल होणार होते. ते निघाले, पण दादर-सायनदरम्यान वाहतूक कोंडीत अडकले आणि तेथूनच माघारी फिरले. आता ते शुक्रवारी सकाळी येतील, अशी माहीती स्थानिक पदाधिकाºयांनी दिली. त्यांचे डोंबिवलीतील सर्व प्रमुख कार्यक्रम शुक्रवारीच आहेत. शनिवारी ते कल्याणमधील पदाधिकाºयांची बैठक घेतील.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे सहकार्य राज झिडकारणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 06:39 IST