एकाकी प्रताप सरनाईक वेगळी चूल मांडून भाजपची झूल पांघरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:04+5:302021-06-23T04:26:04+5:30

ठाणे : आमच्यासारख्या आमदारांचा त्रास कमी करायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, अशा आशयाचे पत्र शिवसेना आमदार प्रताप ...

Will the lone Pratap Saranaik cover the BJP with a different pick? | एकाकी प्रताप सरनाईक वेगळी चूल मांडून भाजपची झूल पांघरणार का?

एकाकी प्रताप सरनाईक वेगळी चूल मांडून भाजपची झूल पांघरणार का?

Next

ठाणे : आमच्यासारख्या आमदारांचा त्रास कमी करायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, अशा आशयाचे पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धाडल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतु, त्यांच्या पत्राची हवाच शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून काढली आहे. यामुळे ते तूर्तास पक्षात एकाकी पडले असून ठाणे शहरात सध्या त्याचे पडसाद उमटले नसले तरी आगामी काळात ते स्वत:ला वाचविण्यासाठी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. तसे झाले तर शिवसेनेला धक्के सहन करावे लागतील, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

सरनाईक यांनी पत्र व्हायरल केल्यानंतर त्रास होत असेल तर त्याची तक्रार पंतप्रधान मोदींकडे करता येऊ शकते, असे सांगून छपत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा, असा सूचक इशारा शिवसेनेने मुखपत्रातून त्यांना दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत राहायचे की शिवसेनेशिवाय पुढे जायचे याचा निर्णय सरनाईकांना घ्यावा लागणार आहे.

सरनाईक हे मूळचे राष्ट्रवादीचे शिलेदार व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीत महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी थेट आव्हाडांना शह देण्यासाठी आपला वेगळा गट निर्माण करून अजित पवारांशी जवळीक साधली. काही वर्षे आव्हाड-सरनाईक यांच्यात पक्षांतर्गत कलगीतुरा सुरू होता, मात्र राष्ट्रवादीत राहून आपल्याला आमदार होता येणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ओवळा-माजिवड्याची मनसबदारी मिळवली. सरनाईक यांची राजकीय इच्छाशक्ती अफाट असल्याने त्यांना शिवसेनेतूनही बराच विरोधाचा सामना करावा लागला. परंतु, सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय काबीज केला. त्यातही मीरा-भाईंदरमध्ये भाजपमध्ये असलेल्या गीता जैन यांना पक्षात आणले. तसेच मीरा-भाईंदरमधील नरेंद्र मेहता यांची मनसबदारी त्यांनी मोडून वर्चस्व सिद्ध केले. यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांची ही आशा मावळली. शिवसेनेतून त्यांना मिळालेले मीरा-भाईंदरचे संपर्कप्रमुखपद शेवटच्या क्षणी कापण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असताना सरनाईक यांच्या वाट्याला मात्र आमदारकीव्यतिरिक्त फारसे काही लागलेले नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याच्या वावड्याही वेळोवेळी उठल्या आहेत. मात्र, हे मतभेद फारसे कधीच उघड झाले नाहीत.

दरम्यान, ज्या काळात शिवसेना अडचणीत होती, त्या वेळेस अर्णब गोस्वामी असेल किंवा कंगना राणावतचे प्रकरण असेल अशी काही प्रकरणे त्यांनी अंगावर घेतली. परंतु आता ते संकटात असताना त्यांना शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची मदत होत नसल्याचे त्यांच्या पत्रातून स्पष्ट झाले. त्यामुळेच आता ते वेगळी चूल मांडतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. सरनाईक यांचा विचार केल्यास त्यांनी आपल्या मतदारसंघात स्वत:चे चांगलेच प्राबल्य निर्माण केले आहे. ठाणे महापालिकेच्या शिवाईनगर, लोकमान्य, सावरकरनगरमध्ये त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्चस्वावर १५ ते २० नगरसेवक निवडून आणले आहेत. तिकडे मीरा-भाईंदरमध्येही सरनाईक यांचा वरचश्मा दिसून येत आहे. या ठिकाणी २४ नगरसेवक आहेत. मात्र, असे असले तरी सरनाईक यांच्या संपर्कातील हे नगरसेवक किंवा पदाधिकारी हे पूर्वापारचे शिवसैनिक असल्याने ते फुटतील असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यातूनही ३ ते ५ नगरसेवक त्यांच्यासोबत जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यातही त्यांनी वेगळी चूल मांडली तर त्याची चाचपणी आधी सरनाईकांना करावी लागणार आहे. त्यातूनही ते भाजपमध्ये गेलेच तर त्याचा फटका ठाण्यात शिवसेनेला बसू शकतो. लोकमान्य, शिवाईनगर, सावरकरनगर भागातील नगरसेवक कमी होऊन त्याचा फायदा सरनाईकांना किंबहुना भाजपला होऊन दोन आमदारही त्यांचे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरनाईक हे महत्त्वाकांक्षी असल्याने आता शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून भाजपला शरण जायचे याचा विचार त्यांना करावा लागणार आहे.

Web Title: Will the lone Pratap Saranaik cover the BJP with a different pick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.