भिवंडी : मार्केटमध्ये उचित भाव न मिळाल्याने शहरातील कापड व्यापाऱ्यांनी यंत्रमागधारकांना व राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून उद्या १६ आॅगस्टपासून जाहीर केलेल्या ‘यंत्रमाग बंद’ची घोषणा हवेत विरण्याची चिन्हे आहेत. परंतु जे माग बंद राहतील त्यावरील कामगारांची मालकासह सरकारला चिंता नसल्याने ते रस्त्यावर येणार आहेत.राज्यात काही ठिकाणी दुष्काळ पडल्याने व कर्जबाजारी झाल्याने शेतकरी जसे आत्महत्या करीत आहेत. त्याचप्रमाणे येथील यंत्रमाग मालकांच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर आत्महत्येची पाळी आली आहे. राज्यात सत्तेवर येणारे सरकार नेहमी ‘यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ’ स्थापन करण्याची घोषणा करते. मात्र, ते स्थापन न झाल्याचा गैरफायदा घेऊन शासनाचे नियंत्रण नसलेला यंत्रमागमालक व कापड व्यापारी मनमानी व्यवहार करून कामगारांचे शोषण करीत आहे. क्रिकेटमधील सट्टाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होते. मात्र, यार्न व कापड मार्केटमध्ये राजरोसपणे सुरू असलेला सट्टाबाजार कोणतेही सरकार बंद करू शकले नाही. याचा फायदा घेऊन शहरातील राजकीय पक्षांचे काही पुढारी चमकोगिरी करून व्यापाऱ्यांना व यंत्रमागमालकांना बंदसाठी चेतवत आहेत. आजतागायत अनेक वेळा ‘यंत्रमाग बंद’ ठेवून हा प्रश्न सुटलेला नाही. मात्र, बंदमुळे शहराच्या जनजीवनावर व छोट्या-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होतो. स्थायिक झालेल्या कामगारांना रोजगार न मिळाल्याने ते कर्जबाजारी होतात. तर, जे स्थायिक नाहीत, त्यांना अवेळी आपल्या गावी जावे लागल्याने त्यांच्या खिशाला चाट बसते. ज्यांना काम नाही, असे हजारो कामगार रस्त्यावर येतात, असा आजवरचा अनुभव आहे.
भिवंडीतील यंत्रमागांचा बंद होणार ?
By admin | Updated: August 15, 2015 23:13 IST