शहापूर तालुक्यातील कळमगाव कानविंदे या गावासह आदिवासी पाड्यांचा रेल्वेच्या वर्षानुवर्षे अरुंद होत चाललेल्या पूल व उड्डाणपुलाअभवी तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आहे. वारंवार मागणी करूनही उड्डाणपूल होत नसल्याने या चक्रव्युहातून आमची सुटका होणार तरी कधी अशी म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.मुंबई - कसारा या रेल्वे मार्गावर कानविंदे, कळमगाव, खरम्याचापाडा, हेदूपाडा, अंबतपाडा, पेंढरी या गावपाड्यातील शेकडो लोक विद्यार्थी दररोज कळमगाव, कानविंदे या गावातील रेल्वेपूलाखालून किंवा तो ओलांडून प्रवास करतात. तो करताना अपघात होऊन अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. ज्या पुलाखालून प्रवास करावा लागतो. त्या पुलाचे मजबूतीकरण करण्याच्या नावाखाली त्यांची रुंदी कमी झाल्याने चारचाकी मोठी वाहनेही जाणे बंद झाले आहे. परिवहन महामंडळाने बसही बंद केल्याने विद्यार्थ्यांसह नागरीकांना १ कि.मी. प्रवास पायीच करावा लागत आहे.या उड्डाणपुलासाठी १५ टक्के लोकवर्गणी भरण्यास ग्रामपंचायत भरण्यास तयार असताना व तशी निवेदने खासदार कै. प्रकाश परांजपे यांच्या पासून ते आजपर्यंतच्या खासदारांना देऊनही काही उपयोग झाला नाही. केवळ आश्वासना व्यतिरिक्त काहीही पदरी पडले नसल्याचे माजी उपसरपंच विरल भेरे यांनी सांगितले. वर्षानवर्ष जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ पार करावे लागत असल्यामुळे आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे ग्रामस्थ सांगतात. (वार्ताहर)
यातून आमची सुटका होणार कधी?
By admin | Updated: September 24, 2015 00:05 IST