लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या आरोपावरून रिक्षाचालकाला घरी बोलावून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, कोळसेवाडी पोलिसांना या घटनेची दखल घ्यावी लागली. त्यांनी मारहाण करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खडेगोळवलीच्या कैलासनगर येथील आदर्श इमारतीत सुनील तिवारी नावाचा रिक्षाचालक राहतो. त्याला काही जणांनी फोन करून घरी बोलावले. तेथे त्याच्यावर मुलीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला. त्याने आरोपांचा इन्कार केला व काही गैरसमज झाला असल्यास माफी मागतो, असे सांगितले, पण त्याचे काही ऐकून न घेता, त्याला स्टम्पने मारहाण करण्यात आली. त्या भागातील अल्पवयीन तरुणी शुक्रवारी रस्त्याने जात असताना, तिवारीने तिला हाक मारून ‘रिक्षात येऊन बस,’ असे सांगत तिची छेड काढली होती. तिने हा प्रकार घरी सांगताच त्यांनी त्याला बोलावून घेत त्याला चोप दिला. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार करायला हवी होती, असे म्हणणे रिक्षा चालकांनी मांडले. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिवारीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
कल्याणमध्ये रिक्षाचालकास बेदम मारहाण
By admin | Updated: May 8, 2017 03:55 IST