ठाणे : महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाच्या परवानगीशिवाय वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटची कामे सुरू केल्याने ती तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आता कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनला केंद्राने मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने ही कामे सुरू होण्याची आशा महापालिकेने व्यक्त केली आहे. नागलाबंदर येथे कोणत्याही प्रकारची कांदळवनाची हानी झाली नसल्याचा अहवालही कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तसेच इतर प्रकल्पांच्या ठिकाणी कांदळवनाची हानी झाली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, दोन महिने बंद असलेले हे प्रकल्प लवकरच सुरू होतील, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली.ठाणे शहराला ३२ किमीचा खाडीकिनारा लाभला आहे. त्याचा विकास करण्याचा कार्यक्रम ठाणे महापालिकेने हाती घेतला होता. त्यानुसार, १३ ठिकाणी त्याचा विकास केला जाणार होता. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात सात ठिकाणच्या वर्क आॅर्डरही दिल्या आहेत. त्यातील प्रत्यक्षात चार ठिकाणी कामही सुरू केले. खारेगाव, नागलाबंदर, कोपरी, साकेत आणि बाळकुम येथील खाडीकिनारा विकसित करण्यासाठी नियोजन करून त्यावर २२४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर कोलशेत, वाघबीळ, कळवा येथील काम दुसऱ्या टप्प्यात सुरूहोणार आहे. मात्र, खाडीकिनाºयावरील जागा पाणथळ भूमी असून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने तेथे उद्यान, जॅगिंग ट्रॅकसारख्या सोयी करताना पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी साचून परिसरामध्ये हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यानुसार, एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त घनता असलेल्या खारफुटीच्या क्षेत्राभोवती ५० मीटर बफर झोन निर्माण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीसुद्धा यासंदर्भात समिती नेमून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीने पाहणी केल्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे.या समितीच्या माध्यमातून पाहणी केल्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर, जर एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर तेथून पुढे काम सुरूकरणार आहे. परंतु, तशी स्थिती निर्माण होऊ शकत नसल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. महाराष्टÑ किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाने या प्रकल्पांची कामे थांबवण्याचे आदेश दिले. नागलाबंदर येथे कांदळवनाची हानी झाल्याच्या मुद्यावरून ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार, इतर ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे हानी झाल्याची शक्यता व्यक्त करून इतर ठिकाणची कामेही दोन महिन्यांपासून बंद होती. परंतु, नागलाबंदर येथे कांदळवनाची कोणत्याही प्रकारे हानी झाली नसल्याचा दावा पालिकेने केला. येथील पाहणी वनविभाग, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली. त्यानंतर, याठिकाणी तशी कोणतीही हानी झाली नसल्याचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर झाल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाने दिली. त्याशिवाय, इतर ठिकाणी सुरू असलेल्या वॉटरफ्रंटच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा कांदळवनाची हानी झाली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचेही म्हणणे आहे.दरम्यान, २००५ मध्ये येथे जशी परिस्थिती होती, ती पूर्ववत करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. त्यानुसार, गुगल इमेजही तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या कामांमुळे येथील अनधिकृत बांधकामे हटवून कांदळवनाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.>सीझेडएम प्लॅन मंजूर झाल्यास कामास सुरुवातमुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन हा दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. परंतु, ठाणे आणि पालघरचा हा प्लॅन अद्याप केंद्राकडून मंजूर झालेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस तो मंजूर होईल, अशी आशा पालिकेला होती. परंतु, अद्याप तो मंजूर झालेला नाही. त्याला मंजुरी मिळाल्यास मागील दोन महिन्यांपासून थांबलेली कामेसुद्धा सुरूकरण्यास वाव असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी मोहन कलाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वॉटरफ्रंटचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:38 IST