ठाणे : मतदार यादीत होणाऱ्या घोळावरुन मागील महिन्यात झालेल्या महासभेत गदारोळ झालेला असताना आणि शिक्षकांनी या कामांना नकार दिलेला असतानाच पालिकेने सक्षम कर्मचारी देण्याऐवजी सफाई कामगार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्याने सुरु असलेल्या मतदार नोंदणी अभियानालाही खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिक्षकांनी हे काम करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश पालिकेने काढल्यानंतरही बहुतेक ठिकाणी ते हजर न झाल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.नव्या मतदारांची विशेष नोंदणी १४ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ती अंतिम टप्प्यात असतांनाच काही महत्वाच्या त्रुटी समोर आल्या आहेत. शहराच्या विविध भागात नवीन मतदार नोंदणीसाठी ६५ स्पॉट तयार करण्यात आले असून तेथे सध्या मतदार नोंदणीचे काम सुरु आहे. परंतु शिक्षकांनी या कामाला नकार दिल्याने आणि पालिकेने त्यांना आदेश देऊनही त्यांनी या आदेशाचे उल्लघंन केल्याने, त्यांच्या जागी पालिकेकडून पर्यायी व्यवस्था केली जात आहे. ती करताना तेथे तेवढ्याच दर्जाचा किंबहुना तेवढी क्षमता असलेला कर्मचारी देणे आवश्यक असताना पालिकेने काही ठिकाणी सफाई कामगारांची नेमणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना ते काम जमत नसल्याने, नवीन मतदार नोंदणी यादीत घोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदार नोंदणीची धुरा सफाई कामगारांवर
By admin | Updated: October 6, 2016 03:16 IST