- अनिकेत घमंडीडोंबिवली: दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी भारतीने कल्याणमध्ये 'एक रात्र भुतांची' या गटारी पिकनिकचे आयोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थी भारतीचे सदस्य आजची म्हणजेच गटारी अमावस्येची रात्र नांदगाव स्मशानात काढणार आहेत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. आपण कळत नकळत अनेक अंधश्रद्धा जोपासतो. त्या दूर होण्याची आवश्यकता असल्याचं संघटनेच्या राज्य विद्यापीठ अध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितलं. 'देशात अंधश्रद्धेने ज्या पद्धतीने थैमान घातलं आहे ते फार भयंकर आहे. आज खूप सहज एखादा भोंदूबाबा एखाद्या सुशिक्षिताला भविष्य सांगण्याच्या नावाखाली लुबाडतो. भोंदूबाबांसाठी हवी तेवढी किंमत मोजायलादेखील सुशिक्षित मंडळीही सहज तयार होतात. अंधश्रद्धेची छोटी मोठी उदाहरणं आपण आपल्याच घरात रोज पाहत असतो. मांजर आडवी गेली की काम होत नाही, उंबरठ्यावर शिंकू नये, शनिवारी नखं कापू नये अशा बऱ्याच गोष्टी असतात. जे आपण पाहतो आणि पटत नसूनही काहीच बोलत नाही. अंधश्रद्धा दूर करण्याची सुरुवात इथून झाली पाहिजे', असे मुधाने म्हणाल्या.अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असं आपण ऐकत असतो. त्यामुळे अमावस्येच्या रात्रीच स्मशानात जाऊन पूर्ण रात्र तेथे काढणार आणि भुतांनी आम्हाला भेटायला यावे यासाठी 'भुता भुता ये रे, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे' या मुलांनी तयार केलेल्या गाण्यामार्फत भुतांना आवाहन करणार आहोत', असे सिद्धार्थ कांबळे यांनी सांगितले.अनेक विद्यार्थी भीती घेऊन येतात आणि निर्भय होऊन जातात. वेगवेगळ्या खेळांमार्फत अंधश्रद्धेची पोलखोल केली जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टास्क दिले जातात. चळवळींच्या गाण्यांची मैफल भरते. चिकनची मेजवानी असते. तर ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सामील व्हायचे आहे. त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे मुंबई विद्यापीठाचे अध्यक्ष आरती गुप्ता यांनी सांगितले.
आज कल्याणच्या स्मशानात 'एक रात्र भुतांची'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:27 IST