वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:21 AM2019-11-19T00:21:29+5:302019-11-19T00:21:41+5:30

सहा दिवसांत कापले ६८० किलोमीटरचे अंतर; खराब रस्त्यांसह अनेक आव्हानांवर केली मात

Vaidya couples make bicycle journey to Ashtavinayak | वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : मागील वर्षीचा डोंबिवली ते पणजी या सायकलदौऱ्याचा अनुभव गाठीशी असलेले येथील शशांक वैद्य व मीरा वैद्य या दाम्पत्याने यंदा नुकतीच ६८० किलोमीटरची अष्टविनायक यात्रा सायकलने सहा दिवसांत पूर्ण केली. त्यांच्या या सायकलस्वारीचे शहरात कौतुक होत आहे.

सायकलमित्र असलेल्या वैद्य दाम्पत्याने याआधी सायकलने सात दिवसांत अष्टविनायक यात्रा केली आहे. त्यामुळे यंदाही सात दिवसांत ही यात्रा पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, अगोदरच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ३ ते ८ नोव्हेंबर, अशा सहा दिवसांतच ६८० किलोमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेला सुरुवात केली.
वैद्य दाम्पत्य पुढे म्हणाले की, ‘केवळ आवड व तब्येत राखण्यासाठी आम्ही सायकल चालवू लागलो. पुढे आम्हाला सायकलयात्रा करण्याचा छंदच जडला. माघी चतुर्थीनिमित्त ३४ वर्षे कल्याण ते पाली सायकलयात्रा करणारे विलास वैद्य व ठाण्यातील राजीव दुधळकर यांनी आम्हाला पालीच्या गणपतीपर्यंत साथ दिली. प्रथम महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले. तेथे विलास वैद्य यांनी आम्हाला पंक्चर झाल्यास ते कसे काढावे, ट्युब कशी बदलावी, सायकलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण दिले. उल्हासनगर येथून सायकलवरून अष्टविनायक दर्शनास निघालेले उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर हे आम्हाला महड येथे भेटले. महडच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पाली येथे मुक्काम केला.’

ते पुढे म्हणाले, ‘दुसºया दिवशी तळेगावला मुक्काम केला. त्यानंतर तिसºया दिवशी दुपारी आम्ही थेऊरला पोहोचलो. तेथे थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिराचे विश्वस्थ हभप आनंद तांबे यांनी आमचे स्वागत केले. उरुळी ते जेजुरीमधील घाट टाळण्यासाठी आम्ही भांडगावमार्गे मोरगावला गेलो. वाटेत आम्हाला बारामती सायकल क्लबचे अन्य सायकलमित्र भेटले. धनंजय मदान यांनी मोरगाव येथे आमची राहण्याची सोय केली होती.’

मोरगावहून सिद्धटेकला आम्ही गेलो. तेथील सिद्धिविनायकाच्या मंदिरातील पुजाऱ्यांना आम्ही सायकलवरून अष्टविनायक यात्रा करत आहोत, हे समजताच त्यांनी सायकलसाठी देवाचे हार दिले. हा आमच्यासाठी सुखद अनुभव होता,’ असे वैद्य म्हणाले. सिद्धटेकहून आम्ही परत दौंडमार्गे केडगाव चौफुला येथे मुक्कामासाठी आलो. वाटेत पाटस-सिद्धटेक हा ३३ किमीचा रस्ता खराब होता. याच रस्त्याने एकाच दिवसात आम्ही परतीचाही प्रवास केला. अशा एकंदर ६६ किमीच्या रस्त्यात पंक्चर काढण्याचे प्रशिक्षणही उपयोगी पडल्याचे ते म्हणाले.
रात्रीपर्यंत ओझरमार्गे लेण्याद्रीला पोहोचण्याचे ठरवले होते. ओझरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली. तेथील ग्रामस्थांनी लेण्याद्रीच्या वाटेत वाघ असल्याचे सांगून रात्री प्रवास न करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही ओझरला मुक्काम केला. शेवटच्या दिवशी लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेतले. त्यानंतर गणेशखिंडीतील चढ पार केला व तेथील गणेश मंदिरात आम्ही दर्शन घेतले. माळशेज घाटातून मुरबाडमार्गे गोवेली येथे आम्ही पोहोचलो. तेथे रायते येथील मित्र आमच्या स्वागतासाठी आले होते. तेथे उल्हासनगरच्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही ८ नोव्हेंबरला डोंबिवलीला घरी परतलो. शेवटच्या दिवशी लेण्याद्री डोंगर चढणे, उतरणे यासह १४५ किमीचा सायकल प्रवास झाला होता. गोव्यापेक्षाही या यात्रेने आम्हाला खूप समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.

दिवसभरात १२ तास केले सायकलिंग
वैद्य दाम्पत्य सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत सायकलने प्रवास करत असे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू होत असे. त्यानंतर साधारण ९-९.३० च्या सुमारास नाश्त्यासाठी ते विसावा घेत. त्यानंतर, १० ते १२.३० च्या सुमारास मधला टप्पा. त्यानंतर जेवण, विश्रांतीनंतर दुपारी २ वाजता पुन्हा पुढचा टप्पा सुरू होत असत. दुपारी ४ च्या सुमारास चहापान. ते झाल्यानंतर साधारण ६ वाजेपर्यंत पुन्हा प्रवास केल्यानंतर मुक्काम करत असत.

Web Title: Vaidya couples make bicycle journey to Ashtavinayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.