ठाणे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण केंद्रे सोमवारी बंद होती. ठाणे शहरात केवळ ग्लोबल कोविड सेंटर येथेच लसीकरण सुरू होते. या केंद्रावर केवळ १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांनाच लस देण्यात आली. त्यामुळे ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करता आलेले नाही.
मागील काही दिवसांपासून ठाण्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ ठाणे मनपावर आली आहे. ठाण्यात रविवारी लसीकरण केंद्रे बंद होती, तर शनिवारीही एकाच केंद्रावर लसीकरण सुरू होते. त्यामध्ये सकाळी पहिल्या दोन तासांत ४५ ते ५९ वयोगटांतील, तर दुपारी दोन तास १८ वयोगटांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सोमवारी लसींचा साठा मिळेल, अशी आशा मनपाला होती; परंतु तीही फोल ठरली. त्यामुळे सोमवारी केवळ ग्लोबल कोविड सेंटर येथे लसीकरण मोहीम सुरू असल्याचे दिसून आले. तेथे दुपारी २ ते ४ दरम्यान १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लस दिली गेली. लसीकरणासाठी तेथे नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे पहिल्या दिवसासारखाच गोंधळ सोमवारीही कायम होता. लसीकरणासाठी ज्यांना आजच्या दिवसाचा मेसेज आला होता, त्यांनाच लस दिली जात होती. इतरांना मात्र घरी जाण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, ठाण्यात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झालेले आहे; परंतु लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाला खो बसला आहे. ठाणे मनपातर्फे ५६ केंद्राद्वारे लसीकरण सुरू आहे; परंतु सोमवारी शहरातील ५५ केंद्र बंद असल्याचे दिसून आले.
--------------