- संदीप प्रधानवरिष्ठ सहायक संपादक
अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून चिमुकल्यांना नेताना काही मुले खाली पडली. पाठीमागून भरधाव वेगात मोटार किंवा बस-ट्रक येत नव्हता म्हणून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जवळपास सर्वच शहरांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा चिंतेचा विषय आहे. आई-वडील नोकरीवर जात असल्याने घरातील आजी-आजोबा किंवा अगदी शेजारीपाजारी या मुलांना स्कूल बस, व्हॅन अथवा रिक्षापाशी सोडतात. त्यानंतर ही मुले त्या बेफिकीर चालकाच्या हवाली असतात. मुले सुखरूप घरी येईपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो. परंतु या असाहाय्य पालकांचे हात दगडाखाली असतात.
ठाणे असो की बदलापूर, डोंबिवली असो की अंबरनाथ या शहरांत फ्लॅट खरेदी करायचे तर एक ते सव्वा कोटी रुपयांपासून ४० ते ५० लाखांपर्यंत खर्च आहे. बँकेचे कर्ज काढण्याखेरीज गत्यंतर नाही. कर्ज काढायचे तर घरातील नवरा-बायको दोघांनीही अर्थार्जनाकरिता घराबाहेर पडले पाहिजे. ठाणे व त्यापुढील शहरांतील बहुतांश मुलांचे पालक सकाळीच घर सोडतात. आपली मुले आजी-आजोबांकडे, पाळणाघरात, शेजाऱ्यांकडे किंवा वेळप्रसंगी घरात एकटी ठेवून पालक निघून जातात. या भागात लोकसंख्या एवढी प्रचंड आहे की, चांगली दर्जेदार शाळा मिळवण्याकरिता पालकांना वशिले, डोनेशनपासून सर्व सव्यापसव्य करावे लागतात. शाळांमध्ये हजारो विद्यार्थी असल्याने वेगवेगळ्या वेळांना शाळा भरतात. लहानगी मुले सकाळीच अथवा अगदी दुपारी रिक्षा, व्हॅनमध्ये कोंबून शाळेत नेली जातात. रिक्षात मागे मुलांना बसण्याकरिता सीटच्या समोर एक अत्यंत बारीक आकाराची फळी बसविलेली असते. त्यामुळे समोरासमोर मुलांना बसविले जाते. त्यांच्यामध्ये काही वेळा मुले उभी करतात.
काही लहान मुले रिक्षाचालक आपल्याशेजारी बसवितो. अनेक घरांत टीव्ही, मोबाइलमुळे झोपायची वेळ रात्री ११ ते १२ दरम्यान असते. सकाळी उठून शाळेत गेलेली काही मुले-मुली शाळेतून येताना किंवा दुपारी जेऊन शाळेत जाताना पेंगलेली असतात. रिक्षाचालकाच्या शेजारी बसलेल्या या मुलांचे डोळे मिटत असतात. रिक्षात मागे दाटीवाटीने बसलेल्या मुलांत वाद, मारामाऱ्या, रडारड सुरू असते. तोंडात गुटखा भरलेला रिक्षाचालक मुलांवर डाफरत असतो. अशीच काहीशी परिस्थिती व्हॅनमध्ये असते. मागे-पुढे कोंडवाड्यासारखी मुले भरलेली असतात. व्हॅनचालकाला मुलांच्या आरोग्याची, सुरक्षेची काडीमात्र चिंता नसते.
शाळेची फी, याखेरीज वेगवेगळ्या गोष्टींकरिता घेतले जाणारे शुल्क, वह्या-पुस्तके, ट्युशन फी, मुलांमधील कलागुणांना वाव देणारे क्लास अशा अनंत खर्चांच्या मांदियाळीत शाळेत ने-आण करण्याचा खर्च ही दुय्यम बाब असते. जो कमीत कमी पैशात ही जबाबदारी उचलेल त्याला पालक प्राधान्य देतात. घराचे हप्ते, इंटरनेट, केबल, मोटारीपासून अनेक वस्तूंचे ईएमआय, घरातील महागड्या वस्तूंची एएमसी असे नानाविध खर्च भागवताना मध्यमवर्गाची दमछाक होते. अनेक रिक्षा व व्हॅनचालक सुरक्षेचे नियम पाळत नाहीत. शाळा प्रशासनही याकडे कानाडोळा करते. त्यामुळे सर्वच शहरांत शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाशी सर्रास खेळ सुरू आहे.