उल्हासनगर : महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला पराभूत करण्याकरिता भाजपाने वादग्रस्त नेते ओमी कलानी यांच्याशी हातमिळवणी करीत उल्हासनगर विकास आघाडी (यूडीए) ची शनिवारी स्थापना केली. उल्हासनगरात आघाडीचा महापौर बसल्यावर शहर विकासाकरिता मोठा निधी सरकारकडून घेऊन येण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.ओमी कलानी यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा गेली दोन ते तीन महिने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपाचे स्थानिक नेते कुमार आयलानी यांनी कलानी यांच्या थेट भाजपा प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. अखेरीस भाजपा, रिपाइं आणि ओमी कलानी यांची उल्हासनगर विकास आघाडी शनिवारी स्थापन झाली आणि तिच्या प्रचाराचा नारळ राज्यमंत्री चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत फुटला.राज्यमंत्री चव्हाण म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांत शिवसेनेने उल्हासनगरचा विकास केला नाही. त्यामुळे येथे पाणी, कचरा, धोकायदायक इमारती अशा नानाविध समस्या आहेत. उल्हासनगरातील या नव्या आघाडीचा महापौर बसला की, केवळ १५ दिवसांत शहर विकासाचा आराखडा मंजूर करून विकासाकरिता मोठा निधी सरकारकडून मंजूर केला जाईल. उल्हासनगरातील लोकांना भीषण पाणीसमस्येचा सामना करावा लागत आहे. ही समस्या अग्रक्रमाने सोडवण्यात येईल. व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. उल्हासनगरातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते हा संपूर्ण राज्याकरिता औत्सुक्याचा विषय आहे. सध्या ठिकठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. हे रस्ते ही उल्हासनगराची देणगी आहे, असे गौरवोद्गार पप्पू कलानी यांचा नामोल्लेख न करता चव्हाण यांनी काढले. आता कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आघाडीचे सर्व नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.खा. कपिल पाटील म्हणाले की, उल्हासनगरच्या विकासाबाबत ओमी कलानी, कुमार आयलानी आणि स्थानिक रिपाइं नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. येथील धोकादायक इमारतींपासून अनेक प्रश्न सोडवण्याची मागणी केली. लागलीच नवी आघाडी स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आणि विकास निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)ज्योती कलानी यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाआमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यापूर्वी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून रान उठवले, तेव्हा पवार यांचे निकटवर्तीय असलेले पप्पू कलानी हेच मुंडे यांचे लक्ष्य होते. पप्पू हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांचे पुत्र ओमी यांच्यावरही काही गुन्हे दाखल होते. मात्र, अलीकडेच काही गंभीर गुन्हे मागे घेण्यात आले.
उल्हासनगरात विकास आघाडी
By admin | Updated: January 29, 2017 03:26 IST