उल्हासनगर - विठ्ठलवाडी पोलीसानी अटक केलेल्या गौतम गणेश वानखेडे याच्यावर मोक्का तर गणेश राणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी याबाबत माहिती देऊन अन्य गुन्हेगारावर अश्याच प्रकारच्या कारवाईचे संकेत दिल्याने, गुंडाचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलिसांनी गौतम वानखडे, रोहन झुंबर वाघमारे व एका अल्पवयीन मुलाला एका गुन्ह्यात अटक केली. यापैकी गौतम वानखडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी गौतम वानखेडे यांने वेगवेगळ्या साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून, गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई होण्यासाठी, नमूद गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कलमांचा अंतर्गत परवानगी मिळण्यासाठी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांना प्रस्ताव सादर केला. एमसीओसी अंतर्गत कलमांचा अंतर्भाव होण्याकरिता अपर पोलीस आयुक्तानी पूर्वपरवानगीला मंजुरी दिली. त्यानंतर गौतम वानखडे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोषनगर मध्ये राहणारा व पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या कडील स्थानबद्ध केलेला गणेश सुरेश राणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कारवाई केली. एका वर्षासाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे राणे याला स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांच्या मोक्का व एमपीडीए अंतर्गतील कारवाईने स्थानिक गुंडाचे धाबे दणाणले आहे. गेल्या महिन्यात हाणामारी, विनयभंग गुन्ह्यातून आधारवाडी जेल मधून बाहेर आलेल्या गुंडाच्या साथीदारांनी त्यांची मिरवणूक काढून ढोल तश्याच्या गजरात व फटक्याची आतिषबाजी करून स्वागत केले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, उल्हासनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. दरम्यान पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, स्थानिक गुंडाचे धाबे दणाणले आहे.