उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी घेतली नागरिकांच्या तक्रारीची दखल
By सदानंद नाईक | Published: April 3, 2024 08:40 PM2024-04-03T20:40:20+5:302024-04-03T20:40:41+5:30
भुयारी गटार व रस्त्याची केली पाहणी
उल्हासनगर : शहरातील खोदलेले रस्ते, भुयारी गटार, धूळ, तुटलेल्या जलवाहिणी आदी नागरिकांच्या तक्रारीची दखल आयुक्त अजिज शेख यांनी घेऊन बुधवारी पाहणी केली. पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदिप जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून सर्वत्र रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. ठेकेदाराने गटारीचे पाईप टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याने, रस्त्याची दुरावस्था होऊन धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. रस्ते खोदताना जलवाहिन्या तुटत असल्याने, लाखो लिटर पाणी खाली जाऊन विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली. या व्यतिरिक्त १५० कोटीतील मुख्य रस्ते, बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली इतर रस्ते व नाल्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. दरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणी टंचाई आदीबाबत केलेली तक्रारींची दखल आयुक्तांनी घेऊन, पाहणी वेळी आयुक्त अजीज शेख यांनी प्रत्यक्ष नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदीप जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, बांधकाम विभागाचे अभियंता तरुण सेवकानी तसेच महापालिकेचे प्रकल्प सल्लागार तसेच कामाचे कंत्राटदार यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कामाची गती वाढवण्यासाठी आयुक्तांनी कंत्राटदारास निर्देश दिले असून धुळीचे प्रमाण कमी व्हावे. यासाठी रस्त्याची कामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे, कामाची गुणवत्ता ठेवणे, याबाबत निर्देश दिले आहे. नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्याचे निराकरण केल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.