Coronavirus: कोरोना रुग्णाच्या सुविधेसाठी ९ कोटी ६० लाखाचा शासनाकडे उल्हासनगर महापालिकेचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 04:38 PM2020-06-13T16:38:03+5:302020-06-13T16:39:13+5:30
उल्हासनगर महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांने साडे सातशेचा टप्पा ओलांडला असून रुग्ण वाढीचा आकडा बघता महापालिकेला मोठ्या निधीची गरज भासणार आहे.
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना सुविधा देण्यासाठी ९ कोटी ६० लाखाच्या प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्याची माहिती उपायुक्त विकास चव्हान यांनी दिली. यापूर्वी शासनाने ६० लाखाच्या निधी दिला. मात्र प्रत्यक्षात दिड कोटी पेक्षा जास्त खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांने साडे सातशेचा टप्पा ओलांडला असून रुग्ण वाढीचा आकडा बघता महापालिकेला मोठ्या निधीची गरज भासणार आहे. गेल्या वेळी राज्य शासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना सुविधा देण्यासाठी ६० लाखाचा निधी मिळाल्याची माहिती उपायुक्त विकास चव्हान यांनी दिली. मात्र कोरोना रुग्णाची वाढती आकडे बघता नवीन रुग्णालयाची स्थापना, डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. कॅम्प नं - ४ येथील शासकीय प्रसूती गृहाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केल्यानंतर, एका आठवड्यात कामगार विमा रुग्णालयाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले. दोन्ही रुग्णालयात रुग्णांना जागा कमी पडत असल्याने महापालिकेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची रुपांतर कोरोना रुग्णालयात केले. त्यापाठोपाठ आयटीआय कॉलेजचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले आहे.
शहरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या बघून महापालिकेने दोन खाजगी जागा व महापालिका मालकीचे टाऊन हॉल व तरण तलाव येथील इमारतीचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्याची चर्चा सुरू झाली. रुग्णालयात साहित्याचा पुरवठा, रुग्णांना औषध, इतर आवश्यक सुविधा, हंगामी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱ्याची नियुक्ती करून वेतन द्यावे लागणार आहे. यासाठी निधीची आवश्यकता असून रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडे ९ कोटी ६० लाखाचा प्रस्ताव पाठविण्याची माहिती उपायुक्त विकास चव्हान यांनी दिली. तसेच महापालिकेच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली असून महापालिकेचा कारभार शासनाकडून येणाऱ्या जीएसटी अनुदानावर सुरु असल्याची माहिती चव्हान यांनी दिली आहे.