- सदानंद नाईक, उल्हासनगरनिवडणूक जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी ठरवण्यावरून मतभेद टोकाला गेल्याने उल्हासनगर भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली. ओमी कलानी यांच्या प्रवेशावरूनच पक्षात दोन तट पडले आहेत. कोअर कमिटीतील वादही विकोपाला गेले आहेत. पक्षातील दुसऱ्या गटाने पुन्हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन एकहाती सत्तेसाठी ओमी टीमला प्रवेश देण्याची मागणी केली. त्याच वेळी कुणा एका व्यक्तीकडे पक्षाच्या निर्णयाचे सर्वाधिकार दिलेले नाहीत, असे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केल्याने माजी आमदार कुमार आयलानींविरोधी गटाने उचल खाल्ली आहे.दरम्यान, ओमी यांनी मात्र भाजपा प्रवेशाचा मुद्दा बाजूला सारल्याचे सांगत त्यांच्याशिवाय निवडणुकीची रणनीती ठरवल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. निवडणूक तोंडावर आल्याने ओमी कलानी टीमच्या प्रवेशासाठी पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी यांनी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले. मुंबई विमानतळावर त्यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत माजी आमदार कुमार आयलानी यांना अधिकार दिले का, अशी विचारणा त्यांनी केली. पालिकेवर पक्षाचा महापौर बसवण्यासाठी ओमी कलानी टीमला निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिल्याचे सुखरामानी यांचे म्हणणे आहे. याबाबतचा दुजोरा अन्य भाजपा पदाधिकारी यांना दिला आहे.ओमी कलानी टीमचा भाजपा प्रवेश निश्चित असून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. कुमार आयलानी यांच्या विरोधामुळे ओमी टीमचा प्रवेश लांबल्याने कलानी टीमचे सदस्य नाराज आहेत. शिवसेनेशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढवून टीमचा महापौर बसवू, असा नारा समर्थक देत आहे. तर, ओमी कलानी यांनी प्रवेशाबाबत आता विचार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ओमी कलानी यांच्या प्रवेशनाट्याने पुन्हा भाजपातील वाद चव्हाट्यावर आले असून पक्षात फूट अटळ असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. ओमी टीमला प्रवेश न दिल्यास अर्धेअधिक नगरसेवक, पदाधिकारी त्या टीमसोबत जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कलानींचा प्रवेश निश्चित : सुखरामानी उल्हासनगरात भाजपाचा महापौर आणण्यासाठी ओमी कलानी टीमला प्रवेश देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. त्यांचा प्रवेश निश्चित आहे. यापूर्वीही कोअर कमिटीतील ७० टक्के पदाधिकाऱ्यांनी प्रवेशाच्या बाजूने असल्याचे निवेदन दिले आहे. दानवे हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ओमी कलानी टीम, भाजपा, साई पक्ष यांची युती झाल्यास पालिकेची सत्ता भाजपाकडे येईल, असा दावा त्यांनी केला.आता भाजपाचा विचार नाही : ओमी शहर विकासासाठी भाजपात प्रवेशाचा प्रस्ताव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गेल्या सहा महिन्यांपूर्वी आला. आता भाजपाचा विचार न करता आम्ही ४८ जागांवर उमेदवार जाहीर केले असून प्रचारही सुरू केला आहे. पालिका निवडणुकीतील स्थानिक पातळीवरील युतीचा अधिकार माझ्याकडे व कोअर कमिटीकडे आहे. ओमी टीमच्या प्रवेशाला आमचा विरोध कायम आहे. सुखरामानी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे कोणती बोलणी केली, याची कल्पना नाही.
उल्हासनगर भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर
By admin | Updated: December 25, 2016 04:36 IST