सदानंद नाईक, उल्हासनगर : फॉरवर्ड लाईन चौकात वाहतूक पोलीस तपासणी वेळी एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा मिळून आल्याने, दोन्ही रिक्षा ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्या. डोंबिवलीला राहणारे रिक्षाचालक रवींद्र मुरलीधर पाटील यांच्याकडे रिक्षाचे खरे कागदपत्रे मिळाले तर सुनिल पाटील या रिक्षाचालकाने बनावट नंबर प्लेट वापरल्याचे उघड होऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
उल्हासनगरात दुचाकी, रिक्षा व चारचाकी गाड्या डबल नंबर प्लेटच्या असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार वाहतूक विभागाने वाहनाची तपासणी सुरु केली. कॅम्प नं-३ येथील फॉरवर्ड लाईन चौकात वाहतूक पोलीस समाधान गरुड हे गाड्यांची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यांना एमएच-०५, सीजी-७०८२ या एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा मिळून आल्या. त्यांनी दोन्ही रिक्षा ताब्यात घेऊन वाहतूक विभाग कार्यालयात आणून कागदपत्रे तपासली असता, डोंबिवलीला राहणारे रवींद्र मधुकर पाटील यांच्याकडे रिक्षाचे खरे कागदपत्रे आढळून आले. तर शहरातील मानेरे गावात राहणारे सुनील पाटील यांच्याकडे रिक्षाची कागदपत्रे मिळून आली नाही. त्याने बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा चालवीत असल्याचे उघड झाले आहे.
उल्हासनगर पोलीस वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भामरे यांनी बनावट नंबर प्लेट वापरून रिक्षा चालविणाऱ्या सुनील पाटील यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दोन्ही रिक्षा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणल्या. बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या रिक्षाचालक सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली असून गाड्यांची डबल नंबर प्लेट वापरणारे वाहतूक पोलिसांच्या टार्गेटवर आले आहे.