ठाणे – “चलो मंत्रालय” या घोषणांनी आज ठाणे शहर दणाणून गेले. शाहापूरहून निघालेला आदिवासी समाजाचा विशाल मोर्चा आज महामार्गावरील वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण करत ठाण्यात दाखल झाला. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मंत्रालयाकडे रवाना होणार असून आज दिवसभर ठाण्यात ठाण मांडून तो उद्या मुंबई गाठणार आहे.
शाहापूरहून सुरू झालेला हा मोर्चा ठाण्यात येईपर्यंत महामार्गावरील अनेक भागात मोठा ट्रॅफिक जाम झाला. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे ठाणे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तासन्तास कोंडीत अडकलेल्या वाहनांना मार्ग काढून देण्यासाठी पोलिसांना अक्षरशः जीव तोड मेहनत घ्यावी लागली.
मोर्चेकरांनी दुपारचे जेवण कॅडबरी जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवरील फूटपाथवरच केले. सायंकाळनंतर हा मोर्चा कोपरी येथील आनंदनगर चेक नाक्यावर थांबवण्यात येणार असून, उद्या मंत्रालयावर धडक देण्यासाठी मोर्चेकर रवाना होणार आहेत.
दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने “उलगुलान जन आक्रोश मोर्चा” या नावाने आवाहन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा मोर्चा १६ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार आहे. आदिवासी समाजाच्या हक्क, पदभरती, शिक्षण, जात पडताळणी तसेच विविध न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची यादी तब्बल २६ मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक घेणे, जात पडताळणी कायद्यात सुधारणा, शासकीय सेवेत प्रलंबित ८५ हजार जागा तात्काळ भरणे, संवर्गीय पदे कायम करणे, रखडलेली पदभरती पूर्ण करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, बोगस गैरआदिवासींना दिलेली जातवैधता प्रमाणपत्रे रद्द करणे अशा विविध मागण्या आहेत.
मोर्चेकऱ्यांचा संघर्षशील पवित्रा, महामार्गावरील कोंडी आणि वाहतूक पोलिसांची दमछाक पाहता उद्या मंत्रालयाच्या पायऱ्यांवर हा मोर्चा गाजणार हे निश्चित आहे.