वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे, वाहनचालकांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:53 AM2019-07-16T00:53:43+5:302019-07-16T00:53:47+5:30

पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे.

Traffic Police Due to Due to Damage | वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे, वाहनचालकांना मिळाला दिलासा

वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे, वाहनचालकांना मिळाला दिलासा

Next

कल्याण : पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनीच पुढाकार घेऊन सोमवारी दगड, विटांचा चुरा टाकून खड्डा बुजविण्याचे काम केले.
शहरातील जुना ऐतिहास पत्रीपूल पाडल्याने त्याला समांतर असलेल्या अरुंद रेल्वे उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी प्लास्टिकचे दुभाजक लावले आहेत. मात्र, त्यांचीही दूरवस्था झाली आहे. या पुलावरून नागरिक व प्रवासी, वाहनचालक दररोज वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे हैराण असलेल्या वाहनचालकांना आता पुलावरील खड्ड्यांचाही सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.
कल्याण-शीळ रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. मे महिन्यात महामंडळाने खड्डे बुजवले. मात्र, आता पावसामुळे पुलावर खड्डे पडले असून, ते बुजविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मागच्या वर्षी खड्ड्यांमुळे कल्याण शहरात पाच जणांचा बळी गेला होता. त्यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका, एमआयडीसी, बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत होते. पालकमंत्र्यांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता रस्ता सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे, असे ठणकावून सांगितले होते. आता पत्रीपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारानंतर तरी या सरकारी संस्थांना जाग येणार आहे का, असा सवाल केला जात आहे.
>वाहतुकीमुळे काम करणे अवघड
महापालिका हद्दीतील सर्व रेल्वे उड्डाणपुलावर मास्टीक अस्फाल्टींग शीट बसविली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांनी सांगितले होते. मात्र, पत्रीपुलावर मास्टीक अस्फाल्टींगचे काम करण्यासाठी जागाच नाही. तसेच सतत वाहतूक होत असल्याने येथे हे काम होऊ शकलेले नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणेने रात्रीच्या वेळी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पुलावरून महापालिकेचे पदाधिकारी आलिशान गाड्यांतून प्रवास करतात. मात्र, त्यांना पुलावरील खड्डे दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.

Web Title: Traffic Police Due to Due to Damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.