डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची सोमवारपासून प्रथम सत्र परीक्षा सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या ९०० परीक्षार्थ्यांना वाहतूककोंडीचा फटका बसला. या शाळेच्या बहुतांशी मार्गावरील विद्यार्थी ठिकठिकाणच्या बसथांब्यांवर ताटकळले. परिणामी, दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणारी परीक्षा दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाली.सकाळच्या सत्रानंतर येणाऱ्या बस वेळेत न आल्याने ही समस्या उद्भवली. प्रत्येक दिवशी दोन पेपर घेण्यात येत आहेत. त्यामुळे पहिल्या पेपरनंतर दुसºया पेपरची सुरुवातही वेळापत्रकाच्या २० मिनिटे विलंबाने झाली. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचे परीक्षेचे नियोजन सपशेल कोलमडले. दुसरा पेपरही वेळापत्रकाच्या २० मिनिटे विलंबाने संपल्याने विद्यार्थ्यांना घरी परतण्यासही विलंब झाला. त्यामुळे पालकांमध्यही गोंधळाचे वातावरण झाले. गेल्या काही दिवसांपासून रोजच स्कूलबसना वाहतूककोंडीमुळे विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनाने दिले.
वाहतूक कोंडीचा ९०० परीक्षार्थ्यांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 03:16 IST